मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथक' स्थापन करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथक स्थापन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे.
मुंबई : साकीनाकायेथे घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथक स्थापन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
साकीनाका परिसरातील पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सक्रिय होत महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिला सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाला निर्भया पथक असं नाव देण्यात यावं अशी सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलीय.
याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यातील गस्ती पथकास निर्भया पथक असं संबोधलं जावं अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे. या निर्भया पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, एक महिला तसंच एक पुरुष अंमलदार आणि एक ड्रायव्हर अशा मनुष्यबळाचा समावेश असेल.
- मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 'महिला सुरक्षा कक्ष' स्थापन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
- मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तैनात मोबाईल व्हॅनपैकी निर्भया पथकासाठी एक मोबाईल व्हॅन कार तैनात केली जाईल.
- एक महिला एसीपी किंवा महिला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मुंबईच्या प्रत्येक विभागात निर्भया पथकाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जाईल (मुंबई पोलीस विभागात 5 क्षेत्र आहेत).
- एका निर्भया पथकाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची महिला अधिकारी आणि पुरुष कॉन्स्टेबल आणि चालक यांची एक टीम तयार केली जाईल.
- निर्भय पथकासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष डायरी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक तपशील स्वतंत्रपणे उपस्थित असेल. जे वेळोवेळी नोडल अधिकारी तपासतील.
- निर्भया पथकात नियुक्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहिले दोन दिवस विशेष प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून ते या बाबींमध्ये तज्ञ होऊ शकेल.
- ज्या पोलीस ठाणे हद्दीत बालगृह, अनाथालय किंवा महिला पीजी आहे तेथे गस्त घालून गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत, ज्या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत त्या क्षेत्रांची ओळख करून घ्यावी आणि त्यानुसार गस्तीची पद्धत तयार केली जाईल.
- झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, कॉलेज कॅम्पस, थिएटर, मॉल्स, बाजारपेठा, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांकडे जाणारे भूमिगत पास, याशिवाय ज्या ठिकाणी लोकांची कमी दरवळ असेल त्यांना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट केले जाईल.
- जर एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने मदत मागितली तर तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत केली जाईल.
- जर एखादी ज्येष्ठ महिला पोलीस स्टेशनच्या परिसरात एकटी राहत असेल तर गस्त घालताना तिला भेटून तिची अडचण समजून घेतली जाईल.
- ज्या लोकांनी गेल्या 5 वर्षात महिला आणि मुलांवर अत्याचार केले त्यांची यादी तयार केली जाईल. पोलिस स्टेशनमधून ही यादी घेऊन या लोकांवर नजर ठेवली जाईल. याशिवाय, एक स्वतंत्र डायरी केली जाईल, जिथे अशा लोकांशी संबंधित माहिती ठेवली जाईल.
- अतिरिक्त आयुक्तांना त्यांच्या परिसरात सल्ला शिबिर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पीडित महिला, पीडित मुलाचे समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञांकडून केले जाईल.
- 5 अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे लावली जाणार.
- अतिरिक्त आयुक्त स्तरावर, असे आदेश देण्यात आले आहेत की प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुप्त कॅमेरे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून स्त्रियांवर पाळत ठेवणे किंवा पाठलाग करणे अशा प्रकरणांमध्ये पुरावे गोळा केले जाऊ शकतात. यासह, दररोज कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणारी सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संगणकात जतन केली जाईल.
- अतिरिक्त आयुक्तांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्भया पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजावर चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- महिला सुरक्षेच्या हेल्पलाईनसाठी 103 क्रमांकाचा वापर केला जातो. ते शक्य तितक्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.