CM Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी आव्हान...
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या निवडणुकीच्या चॅलेंजवर भाष्य केले.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निवडणुकीच्या आव्हानावर जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले आहे. मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही,मला जे आव्हान स्वीकारायचं ते सहा महिन्यापूर्वी पूर्ण केलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. कोळी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. मुंबईबाहेर गेलेल्या माणसाला मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काही जण सकाळी उठतात खोके गद्दार बोलतात. काही लोकं मला आव्हान देत आहेत असे सांगितले. पण, मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही,मला जे आव्हान स्वीकारायचं ते सहा महिन्यापूर्वी पूर्ण केलं असल्याचे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आव्हानाची जास्त इच्छा असेल तर त्यांनी मग महापालिकेच्या वॉर्डात उभे राहावे असा टोलाही त्यांनी लगावला. मी जास्त बोलत नाही, मला काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जेव्हा गुवाहटीला होतो तेव्हा वरळीतून जाऊन दाखवा असं कोणीतरी म्हटले होते. हा एकनाथ शिंदे वरळीतून एकटा गेला. हेलिकॉप्टरने गेला नाही असेही त्यांनी म्हटले.
निवडणुका समोर ठेवून काम करत नाही
निवडणुका समोर ठेवून आम्ही काम करत नसल्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बीएमसी बजेट झाल्यानंतर काही लोकं म्हणतात. नगरसेवक नाही मग कशाला निर्णय घेत आहेत, असे म्हणतात. अरे नगरसेवक नाहीत तर लोकांना सेवा द्यायच्या नाही का? असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सर्व सामान्यांसाठी आहे. हवा प्रदूषण, आरोग्य , शिक्षण सगळ्या कामांसाठी निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी म्हटले. काँक्रीटच्या रस्त्यामुळे अनेकांची दुकान बंद होणार, लोकांना दिलासा मिळणार म्हणून तुमची पोटदुखी आहे का, असा प्रश्नही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला केला. मुंबईतील खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले त्याचा हिशोब निवडणुकीमध्ये चुकता केले शिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
सभेला अल्प प्रतिसाद?
दरम्यान, वरळीतील सभेकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवली. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील सभेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सभेसाठी असलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. लोकांच्या प्रतिसादा अभावी मैदान ओस पडले असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील सभेचा व्हिडिओ ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने होत असलेल्या विकासानंतर शिंदे फडणवीस सरकारची वरळी मतदारसंघातील ऐतिहासिक सभा.. #ये तो सिर्फ झांकी हैं मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है pic.twitter.com/HS1L166QH2
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 7, 2023
ऐवढी भरगच्च सभा कोणाची आहे @BhatkhalkarA ...??? pic.twitter.com/8CkeQk7ORd
— Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 7, 2023