MPSCकडून निवड झालेल्या 111 जणांच्या नियुक्तीला स्थगितीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, आम्ही भक्कमपणे बाजू लावून धरु
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
CM Eknath shinde On MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC ) निवड झालेल्या 111 जणांच्या नियुक्तीला आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे की, आपण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे लोक आहोत. आज 111 लोकांना आपण नियुक्ती देऊ शकत नाहीत. पण जे राहिलेत त्यांची बाजू आम्ही भक्कमपणे लावून धरु आणि त्यांना पण नियुक्ती देऊ, आपण कायदा मानणारी लोक आहोत, असंही ते म्हणाले. ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या न्यायालयासमोर आपण मांडू. मला वाटतं त्यात देखील आपल्याला यश मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांनी म्हटलं की, आज आपण 1034 जणांना नियुक्तीपत्र देत आहोत, त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच. पंतप्रधानांनी दहा लाख नियुक्तीपत्र देणार असल्याची घोषणा केली आहे. आपण देखील 75 हजार नियुक्ती देणार असल्याचे जाहीर केले आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचे आहे, म्हणून ही नियुक्तीपत्रं देण्याचा कार्यक्रम आहे. सरकार म्हणून धाडसी निर्णय घ्यावे लागतात, असंही ते म्हणाले.
शिंदे यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी 2 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले, नगरविकास विभागाचे फक्त पंधरा हजार कोटी प्रकल्प होते. कोण आरोप करतो, त्यात मी जात नाही, आरोप करणे सोपे असते. दोन तीन महिन्यात मोठे प्रकल्प निघून जातात का? तुम्ही आरोप करा मी कामातून उत्तर देईन, असंही ते म्हणाले. निर्णय घेण्याचं देखील धाडस लागतं, जसं धाडस करून आम्ही सरकार बनवलं. मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो, हिम्मत हैं तो किमत हैं. आधी मी पण सरकारमध्ये होतो, पण तेव्हा मला मर्यादा होती, आता मी मुख्यमंत्री आहे, म्हणून लगेच निर्णय घेतला असंही ते म्हणाले.
111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC ) उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या संबंधी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, जो पर्यंत 111 मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्रं मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही. मराठा समाजावर हा अन्याय का केला जातोय असा सवालही त्यांनी विचारला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
ही बातमी देखील वाचा