(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 20 जागांवर पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यातील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागेवर एकूण 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. मुंबईतील प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक राजपत यादव,32 च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी, 76 च्या भाजपा नगरसेविका केशरबेन पटेल, 81 चे भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अवैध जातीच्या दाखल्याने न्यायालयाने रद्द केले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे, मात्र कलम 34 अन्वये मुंबई महानगरपालिकेत पोटनिवडणूक न घेता दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला नगरसेवकपदाची संधी दिली जाते. त्यानुसार, प्रभाग 28 मध्ये शंकर हुंडारे (शिवसेना), प्रभाग 32 मध्ये गीता भंडारी (शिवसेना), प्रभाग 76 मध्ये नितीन सलाग्रे (कॉंग्रेस), प्रभाग 81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ
शिवसेना - 93 भाजपा - 85 काँग्रेस - 31 राष्ट्रवादी काँग्रेस - 9 समाजवादी पार्टी - 6 एमआयएम - 2 मनसे - 1