Bulli Bai App Case : बुली बाई अॅप प्रकरणात तिसरी अटक; 18 वर्षांची तरुणी मास्टर माईंड, पोलिसांकडून कसून तपास
Bulli Bai App Case : बुली बाई अॅप प्रकरणी तिसरी अटक करण्यात आली असून 18 वर्षांची तरुणी मास्टर माईंड असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
Bulli Bai App Case : काही दिवसांपूर्वी महिलांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांचा लिलाव करणारं अॅपचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आरोपींची मोडस ऑपरेंडीही स्पष्ट केली.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे बोलताना म्हणाले की, "बुली बाई अॅप प्रकरणाचा तपास गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. अजून बराच मोठा तपास करायचा बाकी आहे. आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनिय ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर वेबसाठी असलेलं बुली बाई नावाचं अॅप तयार करण्यात आलं होतं. विशिष्ठ समाजातील महिलांचे फोटो या अॅपवर अपलोड करण्यात आले होते. तसेच त्याबाबत आक्षेपार्ह्य संदेश लिहिण्यात आला होता. 31 डिसेंबरला हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. याप्रकरणी 2 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
"तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं वेगानं सूत्र हलवली. बुली बाई नावानं ट्विटर हॅन्डलही करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं ही टीम काम करत होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं याच्या फॉलोअर्सची माहिती काढली. ही वेबसाईट फक्त पाचच जण फॉलो करत होते. आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक विशाल झा, दुसरी आरोपी श्वेता सिंह, तर तिसरी आरोपी उत्तराखंड येथील आहे."
दरम्यान, या प्रकरणाचा तपास अजून सुरु असल्याचं हेमंत नगराळे यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी जाण्याचं काम मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. यांसारखी प्रकरणं पुन्हा घडू नयेत, यासाठी महिला आणि मुलींना आवाहन केलं जाईल, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित तीन ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी 'बुली बाई' अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह