Budget 2021 | ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा तेराशे कोटींची कपात
ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज स्थायी समिती समोर मांडला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा तब्बल तेराशे कोटी कपात यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ठाणे : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा तब्बल तेराशे कोटी कपात करून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज 2755.32 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर मांडला. कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प आज आयुक्तांनी मांडला.
कर वाढ आणि दर वाढ न करून, एक प्रकारे ठाणेकरांना त्यांनी दिलासाच दिला आहे. मात्र त्यात कोणतीही मोठी सवलत देखील दिलेली नाही. या अर्थ संकल्पात सन 2021-22 मध्ये महसुली खर्चासाठी 935 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भांडवली खर्चासाठी 935 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्यावर्षी सादर केलेले मूळ अंदाजपत्रक 4086 कोटी रुपयांच्या होते. मात्र कोविड काळात झालेल्या खर्चामुळे त्यात कपात करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ : ठाणे महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणावेळी गोंधळ
ठाणेकरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करणार या शिवसेनेच्या वचनाचा याही वेळी विसर पडल्याचं दिसून आलं आहे. कारण मालमत्ता कर माफ न करता त्यात सवलत देखील देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर प्रचंड मोठा परिणाम दिसून आलेला आहे. पालिकेला मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या शहर विकास विभागाकडून अपेक्षित असं उत्पन्न न मिळाल्याने यावर्षी सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.