मुंबई महापालिकेने फक्त मुंबईकरांसाठीच मोफत लसीकरण, उपचार करावेत : विरोधी पक्षनेते रवी राजा
खासदार राहुल शेवाळे यांनी, प्रथम केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी, त्यास आम्ही नक्कीच समर्थन देऊ, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्यातील 18 वर्षांवरील नागरिकांना 1 मे पासून मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडून पैसे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्य सरकारने नंतर मुंबई महापालिकेचे पैसे परत करावेत, असंही त्यांनी म्हटले आहे. मात्र या मागणीशी आपण असहमत आहोत, असं मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं आहे.
वास्तविक लॉकडाऊनच्या काळात आर्थिक फटका बसल्याने राज्यातील व मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण हे मोफत व्हावे, यात काही दुमत नाही. तसेच, मुंबईकरांचे लसीकरण व त्यांचा कोविड उपचारावरील संपूर्ण खर्च हा मुंबई महापालिकेनेच आतापर्यंत केला आहे आणि करत आहे व यापुढेही करत राहील.
केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे जीएसटी पोटी 24 हजार कोटी रुपये थकीत आहेत. केंद्र सरकारने ते थकीत 24 हजार कोटी रुपये राज्याला तातडीने दिले तर राज्यातील जनतेला कोविडबाबत अधिक चांगल्या सेवासुविधा देता येतील. राज्य सरकार जनतेला सर्व आरोग्य सुविधा, लस मोफत देईल. तेव्हा खासदार राहुल शेवाळे यांनी, प्रथम केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी, त्यास आम्ही नक्कीच समर्थन देऊ, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज
केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला परवानगी दिली आहे. याची सुरुवात 1 मे पासून संपूर्ण देशभरात होणार आहे. तसेच 1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार? अशी चिंताही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मोफत लसीकरण आणि लसींचा तुटवडा हे प्रश्न ऐरणीवर असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण नेमकं कसं होणार यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. मात्र, लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.