Mumbai Corona Vaccination : 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज, पण... : महापौर किशोरी पेडणेकर
Maharashtra Corona Vaccination : लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी यावेळी स्पष्ट केलं. पण जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असंही त्या म्हणाल्या.
Maharashtra Corona Vaccination : केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला परवानगी दिली आहे. याची सुरुवात 1 मेपासून संपूर्ण देशभरात होणार आहे. तसेच 1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार? अशी चिंताही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मोफत लसीकरण आणि लसींचा तुटवडा या प्रश्न ऐरणीवर असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण नेमकं कसं होणार यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देत आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांत जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, पण जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल."
"आपल्याला 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. मात्र लसीकरणाचा साठा आल्यानंतर जे 45 वर्षांवरील कोमॉर्बिड लोक, तसेच जे 60 वर्षांवरील आहेत. ज्यांचा आता दुसरा डोस सुरु आहे. त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याला त्याच वेळी चालवावा लागणार आहे. त्यामुळे अद्यापही राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका सुरु आहेत.", अशी माहितीही महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.
महापौर पुढे बोलताना म्हणाल्या की, "राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका सुरु आहेत. 1 मे पासून लसीकरण निश्चितच सुरु होणार आहे, पण ते सुरु होत असताना, कुठे होणार? कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा सुरु होणार, याबाबतचं नियोजन करण्यासाठी काही जणांच्या सूचना देखील आल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाची विभागणी करावी लागणार आहे. सर्व वयोगट एकत्र करणं हे योग्य ठरणार नाही. कोविन अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर आणि लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे." तसेच यासंदर्भात आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरु आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळ्या गाईडलाइन्स येईल त्यावेळी यांसदर्भातील माहिती सर्वांना देण्यात येईल, असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Corona Crisis : 1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चिंता व्यक्त
- जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही- संजय राऊत
- Maharashtra Covid 19 vaccinations : मोफत लसीकरणाबाबत उद्या कॅबिनेट बैठकीत चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील : उपमुख्यमंत्री