ठाणेकरांचं पाणी महागलं
मुंबई महानगरपालिकेकडून मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी उचलले जाते. त्यामधील 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.
मुंबई : मुंबईकरांना ठाणे आणि इतर बाजूच्या जिल्हांमधील सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे आणि भिवंडीला पाणीपुरवठा केला जातो. ठाण्याला केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दरामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात तलावांमधून 3900 दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी उचलले जाते. त्यामधील 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.
ठाणे जिल्ह्यात या पाण्याचा वापर ग्राहकांना घरगुती व व्यावसायिक वापरासाठी केला जातो. गेल्या 15 वर्षात या पाणी पुरवठ्याच्या दरात महापालिकेने वाढ केलेली नाही. या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीत लागू असलेले दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे पालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही दरवाढीची सुधारणा करण्यात आली आहे.
यानुसार शुद्ध पाणीपुरवठ्याच्या दरात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला आवश्यक असणारे 700 दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून पुरवण्यात येते. मुंबई पालिकेकडून ठाण्याला दररोज 150 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात असल्याने ठाणेकरांच्या पाण्याची गरज भागत असते.
ठाण्याला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याद्वारे मुंबई महापालिकेला सध्या 25 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल मिळत होता. पाणी दरात वाढ केल्यावर महापालिकेला 40 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
यामुळे मुंबई महापालिकेला वर्षाला पाणी पुरवठा दरवाढीद्वारे 14.58 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ही दरवाढ महानगरपालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून 30 दिवसांनी आणि 90 दिवसांपूर्वी अमलात आणली जाणार आहे.