(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Election : राजाचा जीव पोपटात..., त्यामुळे काहीही झालं तर मुंबई महापालिका जिंकणारच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Devendra Fadanvis : शिवसेना नेते मोदींचे मोठे मोठे फोटो आणि उद्धव ठाकरेंचा स्टँप साईज फोटो लावून निवडून आले होते अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई: राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे.
अडीच वर्ष कोरोना संकट होतं, दुष्काळात तेरावं तसे उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं. अशा काळात भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी बसला नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करत होतो. अडीच वर्षांनी आपल्या आशीर्वादाने शिवसेना आणि भाजप सरकार आलं आहे. शिवसेना नेते मोदींचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आले होते. मोदींचे मोठे फोटो आणि उद्धव ठाकरेंचा स्टँप साईज फोटो लावत होते.
राजाच्या मेलेल्या पोपटाची गोष्ट सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, सातत्याने बेकायदेशीर सरकार असल्याचे सांगत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांचेच सरकार कायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब केलं. काही जण बोलतात, आम्हीच जिंकलो. आताचं सरकार टिकणारं आहे, काम करणारं आहे, पुन्हा निवडून येणारं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वसुली किती केली यासाठी वाजेची कथा सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रावर सूड उगवण्याचे काम यांनी केले. भुयारी मेट्रो सुरु झाली असती, ती यांनी थांबवून ठेवली. परिणामी 10 हजार कोटींनी खर्च वाढला. हेच पैसे गरिबांसाठी कामाला आले असते. नरेंद्र मोदी आणि भाजपाला श्रेय मिळेल म्हणून गरिबांचे अनुदान अडवले.
राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हा राजकीय प्राण नाही, तर कुरण आहे. 25 वर्षे कुरण खाऊन हे मोठे झाले आहेत. ही महापालिका लुटून खाल्ली आहे. पुढची 40 वर्षे रस्त्यावर खर्च करावा लागणार नाही म्हणून रस्ते काँक्रिट करायला हे विरोध करत आहेत. असेच मुंबईला लुटत गेले, खात गेले आहेत. धारावी प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला होता, अडीच वर्षे यांनी हात लावला नाही. आता आपण टेंडर काढलं आहे, तीन महिन्यात काम सुरु होईल. त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा जिंकायची आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या पैशांचा खुराक जोपर्यंत बंद होत नाही, मुंबई महापालिका तिजोरी मुंबईकरांच्या हाती देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मुंबई महापालिका जिंकायची आहे ती कुणाला महापौर किंवा उपमहापौर बनवायला नाही तर मुंबई महापालिका आणि तिजोरी मुंबईकराच्या हातात द्यायची आहे. सर्व आघाडी आणि मोर्चांनी ताकद लावली तर मुंबई महापालिकेवर भाजप, शिवसेना व रिपाइचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नवमतदारांची नोंदणी करायची आहे. 18 ते 22 या वयोगटात विद्यापीठात नोंदणी आणि मतदार नोंदणीत फक्त 20 टक्के नोंदणी आहे. मोदींना मानणारा हा वयोगट आहे. स्कील डेव्हलपमेंटमध्ये लोढा यांनी उत्कृष्ट काम केले आहे. प्रत्येक विधानसभेत स्कील डेव्हलपमेंट, रोजगार मेळावा सुरु आहे. मुलांची नोंदणी करू शकतो, मतदार नोंदणी करू शकतो
भाजप सोडून इतर पक्षात घराणेशाही
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं की, आजची गर्दी पाहून मला समाधान वाटत आहे. भाजप हा एकमेव असा पक्ष आहे ज्याची वाढ शास्त्रोक्त आहे, या पक्षातील कार्यकर्त्यांचीही खूप प्रगती झाली आहे. आज भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, येत्या काळात आमच्या पक्षाचा अभ्यास केला जाईल. आजकाल बाकीच्या पक्षाची अवस्था अशी आहे की कोणाकडे नेता असेल तर धोरण नाही, पक्षात दोन्ही असेल तर हेतू नाही, पण भाजपकडे सर्व काही आहे, नेता, धोरण आणि हेतू आणि कार्यकर्ते. इतर पक्ष हे कौटुंबीक पक्ष झाले आहेत.