ठाकरे सरकार विरोधात भाजप आक्रमक, उद्या राज्यभरात 400 ठिकाणी आंदोलन
भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात कंबर कसली आहे. उद्या राज्यभर 400 ठिकाणी भाजपकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनं केली जाणार आहे. भाजपचे बडे नेते या आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढते अत्याचार यासह महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप उद्या विविध ठिकाणी धरणं आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप उद्या राज्यभरात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आंदोलन प्रमुख संजय कुटे यांनी दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भाजपतर्फे अधिवेशन काळात करण्यात येणार आहे. यासाठी 25 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आजाद मैदान येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार सहभागी होणार आहेत.
Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. तसेच या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपकडून धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर घणाघात
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला होता. महाविकास आघाडी सरकार एकाही आश्वासनाची पूर्तता न करता, सरकार घुमजाव करताना दिसत आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली मात्र अजून ती पूर्ण केलेली नाही. पीक कर्जाशिवाय कुठल्याही कर्जमाफीची माफी नाही. त्यामुळे याला सरसकट कर्जमाफी म्हणता येणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. महिलांवरचे वाढते अत्याचार यावर सरकारचं नियंत्रण नाही. सरकारची याबाबच संवेदनशील दिसत नाही. कारण पोलिसांचं खच्चीकरण करण्याचे अनेक प्रकार सरकारकडून होताना दिसत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस