Nishikant Dubey : निशिकांत दुबेने महाराष्ट्राविषयी गरळ ओकली, पण पैसे कमावण्यासाठी मुंबईच दिसली, खारमध्ये कोट्यवधींचं घर अन् बरंच काही
Nishikant Dubey Mumbai Property : आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राला बोल लावणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना पैसे कमवण्यासाठी आणि घर घेण्यासाठी मुंबईच दिसली हे विशेष.

मुंबई : मराठी माणूस आणि महाराष्ट्र विरोधात बोलणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वत:चं काय आहे? इतरांच्या पैशांवर महाराष्ट्र जगतो असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबे यांचा मुंबईतल्या खार पश्चिम परिसरात कोट्यवधींचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत सात ते आठ कोटी इतकी असल्याची माहिती आहे. तसेच महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही म्हणणारे खासदार निशिकांत दुबे हे स्वत:च मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत डायरेक्टर पदावर होते.
Nishikant Dubey Mumbai Connection : निशिकांत दुबेंची दोन कनेक्शन समोर
मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःचं असं काय आहे, अशी बेताल बडबड करणाऱ्या निशिकांत दुबेंची दोन मुंबई कनेक्शन्स समोर आली आहेत. पहिलं कनेक्शन म्हणजे त्यांचा आलिशान फ्लॅट. पश्चिम मुंबईच्या खार परिसरात दुबेंचा मोठा फ्लॅट आहे. 1680 चौरस फुटांचा हा फ्लॅट तब्बल सात ते आठ कोटींचा आहे.
दुसरं कनेक्शन आहे त्यांच्या माजी संचालकपदाचं. राजकारणात जाण्यापूर्वी दुबे एका मोठा बहुराष्ट्रीय कंपनीत संचालक पदावर होते. या कंपनीचं ऑफिस मुंबईतच आहे. 1993 ते 2009 पर्यंत मुंबईत हेजऑफीस असणाऱ्या स्टील, दूरसंचार आणि उर्जा या क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या कंपनीत दुबे यांनी व्यवस्थापनातील सर्वोच्च पद भूषवले होते.
राजकीय स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राला बोल लावणाऱ्या दुबेंना पैसे कमवण्यासाठी आणि घर घेण्यासाठी मुंबईच दिसली हे विशेष.
Nishikant Dubey On Maharashtra : काय म्हणाले होते निशिकांत दुबे?
राज्यातल्या मराठी-अमराठी वादावर बोलताना भाजप खासदार निशिकांत दुबेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महाराष्ट्राबाहेर या आपटून मारू अशी धमकीच दुबेंनी दिली. हिंमत असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम, तामिळ, तेलगू यांना मारून दाखवा अशा शब्दात दुबे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना डिवचलं. तुम्ही कुणाच्या जीवावर जगताय, तुमच्याकडे आहेच काय., महाराष्ट्रात खाणी आहेत का, असं अतिशय बेजबाबदार वक्तव्यदेखील दुबेंनी केलं.
निशिकांत दुबे वक्तव्यावर ठाम
'पटक पटक के मारेंगे' या वक्तव्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम आहेत. लोकांना धमकावून ठाकरे राजकारण करत आहेत ते यशस्वी होणार नाही असं ते म्हणाले. मुकेश अंबानी मराठी बोलत नाहीत, त्यांना मारून दाखवा. ठाकरे गरीब लोकांना मारतात, हिंमत असेल तर माहीमच्या मुस्लिमांना मारून दाखवा असं ते म्हणाले. ठाकरे परिवाराला चपलेने मारण्याच्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे असं ते म्हणाले.























