BJP Morcha against Nawab Malik LIVE : देवेंद्र फडणवीस यांची सुटका, इतर नेत्यांचीही सुटका होणार
BJP Morcha against Nawab Malik LIVE : ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजप आज मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

Background
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा : आशिष शेलार
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येत नाही हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे. केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी ठाम भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे.
नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना 21 मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने PMLA कोर्टात दिली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची सुटका, इतर नेत्यांचीही सुटका होणार
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने मुंबईत आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. दरम्यान पोलिसांनी फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांनाही सुटका करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.























