राष्ट्रवादी मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आलीय; गाडीवरील दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका
सोलापुरात काल गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर यांनी 'राष्ट्रवादी गुद्द्यावर येतेय' असा आरोप केला.
मुंबई : "राष्ट्रवादी आता मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आली आहे," असं भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल गाडीवर झालेल्या दगडफेकीवर म्हटलं आहे. "राष्ट्रवादीचा खरा चेहरा आता समोर आला आहे," अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवरील आपल्या टीकेचं समर्थन करताना राष्ट्रवादीवर हल्ला केला.
सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "राष्ट्रवादीने पूर्वनियोजित पद्धतीने माझ्यावर हल्ला केला. दगडफेक करणाऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. तो शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता होता, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. मी खालच्या भाषेत टीका करत नाही, मी माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्टपणे मांडतो. कोणाला ही खालच्या भाषेतील टीका वाटत असेल तर मला फिकीर नाही. मी शिव्या देत नाही, मी फक्त मुद्द्यांवर बोलतो, राष्ट्रवादीने मुद्द्यावर बोलावं. राष्ट्रवादी गुद्द्यावर येतेय, आज दगड घालत आहेत. राष्ट्रवादीचा दादागिरीचा, मवालीगिरीचा चेहरा समोर आला आहे." तसंच "पुरोगामीत्वाचा बुरखा कुठे गेला?" असा सवाल पडळकर यांनी विचारला.
पडळकरांच्या गाडीवरील हल्ला त्यांचाच प्रसिद्धी स्टंट : अमोल मिटकरी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरचा हल्ला त्यांचाच प्रसिद्धी स्टंट असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. स्वत:ला शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणारे गोपीचंद पडळकर 50 लाखांच्या गाडीतून कसे फिरतात, असा सवाल मिटकरींनी यांनी विचारला आहे.
गोपीचंद पडळकरांकडून रोहित पवारांचा फोटो ट्वीट
गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्याच्या संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्यांचा थेट रोख रोहित पवार यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे. "प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल...घोंगडी बैठका सुरूच राहणार..." असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल...
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021
घोंगडी बैठका सुरूच राहणार... pic.twitter.com/909jRWb389