मी प्राथमिक शाळेतच होतो, पण त्याने इतिहास बदलत नाही - फडणवीसांचं पवारांना उत्तर
Devendra Fadanvis : इतिहास हाच की शरद पवारांनीही बाहेर पडत सरकार बनवले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadanvis : मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने जे केले ती बेईमानी कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा उपस्थित केला.
रविवारी चंद्रपूर येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा उल्लेख केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत असतील, त्यामुळे त्यांना इतिहास ठावूक नसेल, असे म्हटले होते. त्याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शरद पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शिक्षणच घेत होतो. पण, मी काल जे बोललो, जे एकतर पवार साहेबांनी पूर्णपणे ऐकले नाही किंवा ते शरद पवारांना अस्वस्थ करणारे होते. 1978 मध्ये ते वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. तेव्हा ते 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी आमच्यासोबत सरकार सरकार स्थापन केले. कालही मी हेच सांगितले होते. ते आमच्यासोबत म्हणजे जनसंघासोबत आले, हे तर मी कालच भाषणात सांगितले. पण, माझा मूळ प्रश्न हा आहे की, पवारांनी केले ती मुत्सदेगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केली ती बेईमानी कशी? उलट एकनाथ शिंदे यांनी जे केले ती मेरिटची केस आहे. ते निवडणुकीत आमच्यासोबत निवडून आले होते आणि आमच्याच सोबत आले. याउलट शरद पवार काँग्रेससोबत निवडून आले आणि आले आमच्यासोबत. मी प्राथमिक शाळेत असो की जन्माला आलो नाही, याने इतिहास बदलत नसतो. इतिहास हाच आहे की, पवार यांनी 40 आमदार घेऊन सरकार पाडले आणि त्यांनी सरकार बनविले, तेवढेच मी सांगितले.
राष्ट्रवादीत ओबीसी नेते नाहीत, असे मी म्हटले नाही. राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि संवैधानिक पदे द्यायची वेळ आली की त्यांना ओबीसी दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते खाजगीत जे बोलतात तेच मी जाहीरपणे बोललो, ते कदाचित पवारांना आवडले नसेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिका अधिकार्यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की, कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्यावर आम्ही कारवाई करु.
भारताला राजकीय स्वातंत्र हे 15 ऑगस्ट 1947 रोजीच मिळाले, हे सत्य आहे. पण, अखंड भारत हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. पण, अखंड भारताचे स्वप्न पाहणार्यांनाही स्वातंत्र्यांची तारीख बदलता येणार नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ हा औरंगजेबाने केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. धर्म बदलण्यासाठी दबाव आल्यानंतर त्यांनी अत्याचार सहन केले पण, त्यांनी ती मागणी मान्य केली नाही. हा इतिहास उभ्या जगाला माहिती आहे, तो बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.