जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
मोर्चात मविआच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मविआला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis On MVA March: मुंबईत आज महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत मविआच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मविआला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते आज मोर्चा काढतात. रोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका फडणवीसांनी केली.
त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही
उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो तसा आजचा मोर्चा नॅनो
फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतोय तसा आजचा मोर्चा नॅनो होता.
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सीमा प्रश्नाला काँग्रेस जबाबदार आहे, या आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे.
फडणवीसांचा राहुल गांधींवर देखील हल्लाबोल
फडणवीस म्हणाले की, बिलावर भुट्टो आणि राहुल गांधी एकत्र कसे बोलतात? बिलावर भुट्टो एका फेल राष्ट्राचे मंत्री आहे. ते आतंकवादी देशाचे मंत्री आहेत. पण भारताच्या पंतप्रधानांबद्दल जेव्हा भुट्टो बोलले तेव्हा देशासाठी भुट्टोची निंदा करायला हवी होतं पण त्यांनी केली नाही. भारताचा भूभाग जेव्हा चीनमध्ये गेला, तेव्हा राहुल गांधी यांच्या घरातील व्यक्ती नेतृत्व करत होती. त्यामुळे राहुल गांधी यांना बोलण्याचा अधिकार नाही. मोदींच्या काळात तर चीनला रोखण्याचे काम केले आहे. एक इंच भारताची भूमी मोदींच्या काळात गेली नाही, असंही फडणवीस म्हणाले.
मविआच्या मोर्चासंबंधी प्रत्येक अपडेट्ससाठी लाईव्ह ब्लॉग फॉलो करा