Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापूरमध्ये भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना 26 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या आहेत.

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापूर मनपात महापौरपदासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निश्चित झालं आहे. त्यामुळे या प्रवर्गातून भाजप कोणाला संधी देणार? याची उत्सुकता आहे. गेल्या 20 वर्षात प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रथमच महापौर ओबीसी प्रवर्गातून होणार आहे. त्यामुळे कोणाला संधी दिली जाणार? याकडे लक्ष असेल. कोल्हापूरमध्ये महायुतीने काठावरचे बहुमत मिळवलं आहे. कोल्हापूरमध्ये भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असून 26 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या आहेत, तर जनसुराज पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला आहे.
विजयसिंह देसाई भाजपकडून आघाडीवर
दुसरीकडे, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरोधात असला तरी सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसला 34 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाड झाला नाही तर निश्चितच भाजपचाच पहिला महापौर कोल्हापुरात होऊ शकतो. ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याने भाजपकडील सात ते आठ नगरसेवकांपैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूरमध्ये विजयसिंह खाडे आणि विजयसिंह देसाई ही दोन नावे सध्या आघाडीवर आहेत. विजयसिंह देसाई सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. विजयसिंह देसाई यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून नगरसेवक आहेत. विजयसिंह देसाई शहरासह जिल्ह्यात परिचयातील नाव आहे. त्यांचं संघटन पक्षासाठी जमेची बाजू आहे. संधी मिळाल्यास आपली छाप सोडू शकतात. विशेष म्हणजे विजयसिंह देसाई यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
विजयसिंह खाडे यांचं सुद्धा नाव चर्चेत
दुसरीकडे, भाजपकडून विजयसिंह खाडे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. भाजपचे नगरसेवक म्हणून ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपकडून कोणाला संधी देणार? याकडे लक्ष असेल. तथापि, अजूनही महायुतीमध्ये प्रमुख महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चढाओढ सुरूच आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या घडामोडी घडल्या ते पाहता कदाचित शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा महापौर होऊ शकतो, अशी स्थिती आहे. भाजपकडून महिलेला संधी देण्याचा विचार झाल्यास भाजपकडून रूपाराणी रिकाम यांच्या सुद्धा नावाचा विचार होऊ शकतो.
कोल्हापुरात महायुतीचे ओबीसी प्रवर्गातील विजयी उमेदवार
- माधवी प्रकाश गवळी
- विशाल किरण शिराळे
- अनुराधा सचिन खेडकर
- विजयसिंह वसंतराव देसाई
- अजय इंगवले
- अश्किन गणी आजरेकर
- रेखा रामचंद्र उगवे
- कौसर बागवान
- मानसी लोळगे
- प्रमोद देसाई
- विजयसिंह खाडे
- वैभव कुंभार
शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दावा
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडे अश्किन आजरेकर आणि अजय मगदूम असे दोन नगरसेवक सध्या ओबीसी प्रवर्गातून आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जर महापौर पद विभागून देण्याचा निर्णय झाल्यास पहिल्यांदा संधी शिवसेना शिंदे गटाला दिले जाणार की मोठा पक्ष म्हणून भाजपला संधी दिली जाणार? याकडेही लक्ष असेल. कोल्हापूरमधील पदांची खांडोळी ही राज्यांमध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेला विषय आहे. त्यामुळे महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना महापौरपद पाच वर्षांसाठीच थेट दिले जाणार की अडीच वर्ष असतील याबाबतही स्पष्टता नाही. जर महापौर पद भाजपकडे गेल्यास स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे दिले जाणार का? याकडेही लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या




















