BMC Election : मनसैनिकांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी, आशिष शेलारांचा तोल कसा सुटला? की त्यामागे मुंबई महापालिकेचं समीकरण?
Ashish Shelar Vs MNS : भाजप नेत्यांची वक्तव्य ही नकळतपणे केली जात आहे की ती जाणूनबुजून केली जात आहेत हे समजायला मार्ग नाही. यामागे महापालिकेच्या मतांचं समीकरण दडल्याची चर्चा आहे.

मुंबई: पुढारीपणाच्या नादात अनेक नेत्यांचा बोलताना तोल जातो. मग हा पुढारी सत्तेच्या दरबारातला असला तर जीभ अजून सैल होते. याचा प्रत्यय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या वक्तव्यानं आला. त्यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडताना शेलारांचं भान सुटलं आणि त्यांनी मनसैनिकांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली.
आशिष शेलार हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री. शेलार हे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. सध्या तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची भाजपची तयारी त्यांच्याकडेच आहे. या तयारीदरम्यान, शनिवारी मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित आणि मोठा मेळावा झाला.
ठाकरेंच्या या मेळाव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीची समीकरणं नक्कीच बदलली जातील असं निवडणूक तज्ज्ञांना वाटतंय. त्यामुळं भाजपचे नेतेही लगेचच सावध होऊन ठाकरे आणि त्यांच्या आंदोलनांवर तुटून पडत आहेत. पण या आंदोलनावर टीका करताना आशिष शेलारांचा तोल सुटला आणि मनसैनिकांची त्यांनी थेट पहलगामच्या दहशतवाद्यांसोबत तुलना करुन टाकली.
ठाकरे-मनसेकडून प्रत्युत्तर
आशिष शेलारांकडून ही तुलना नकळत झाली की त्यांनी विचारपूर्वक केली हे सांगणं कठीण आहे. पण या असंबंध आणि वादग्रस्त टीकेला प्रत्युत्तर मिळणार नाही असं शक्यच नव्हतं. मनसेच्या नेत्यांनी भाजपच्या आशिष शेलारांना तासा-दोन तासांतच प्रत्युत्तर दिलं. ठाकरे गटाच्या किशोरीताई पेडणेकरांनीही शेलारांचा समाचार घेतला. पहलगामचे दहशतवादी तुमचे कोण होते असा सवाल त्यांनी केला.
नितेश राणेंनी वाद दुसऱ्या मुद्द्यावर नेला
आशिष शेलारच नाही तर नितेश राणेंनी मनसेच्या आंदोलनात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अमराठी लोकांची बाजू घेतली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेच्या नेत्यांना आव्हान दिलं होतं. मराठी-अमराठीच्या वादाचा मुद्दा हा नितेश राणे यांनी थेट हिंदू-मुस्लिम वादावर नेला. गरीब हिंदूंना मारणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा, मोहम्मद अली रोड येथे जाऊन मराठी बोलण्याची सक्ती करावी असं आव्हानच त्यांनी दिलं.
नितेश राणे आणि आशिष शेलारांची ही वक्तव्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंबंधात आहेत यात शंका नाही. भाजपला ही मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी-अमराठी मुद्याभोवती घोळवायची आहे का अशी शंका आता येत आहे.
मुंबई आणि उपनगराची लोकसंख्या 2 कोटी 40 इतकी आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासगर, भिवंडी, मीरा भायंदर, वसई-विरार आणि पनवेल अशा आठ महापालिका आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये मराठी लोकांची संख्या 42 टक्के आहे. गुजराती 19 टक्के आहेत आणि उरलेल्या 39 टक्क्यांमध्ये बहुतांश उत्तर आणि दक्षिण भारतीय आहेत.
मुंबईतली ही टक्केवारी बघता भाजप उत्तर भारतीय आणि गुजराती या परंपरागत मतदारांसाठी चार पावलं पुढं जाणार हे साहजिक आहे.
ही बातमी वाचा:























