कोरटकरनंतर आता शिंदेंच्या आमदाराचे छ. शिवरायांबद्दल अपशब्द; दिल्लीची हुजरेगिरी करताना किती लाचारी करायची? ठाकरे गटाचा सवाल
Sanjay Gaikwad : विविध भाषा शिकण्याच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकडवा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याची घटना घडली.

मुंबई : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महापुरुषांचा अवमान करण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांची भर पडली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय गायकवाडांनी यावेळी छत्रपती संभाजीराजे आणि छ. शिवाजीराजेंचे उदाहरण देताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यावरुन ठाकरे गटाने आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवराय छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि जिजाऊंचा अवमान करणाऱ्या आमदाराने जाहीर माफी मागावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंनी केली आहे.
वास्तविक, आमदार संजय गायकवाड बोलत होते ते विविध भाषा शिकण्याच्या मुद्द्यावर. मात्र भाषेबाबत बोलताना आपल्या तोडीं नेमकी कुठली भाषा आहे, याचं भान त्यांना राहिलं नाही.
संजय गायकवाड काय बरळले?
संजय गायकडवा म्हणाले की, "तुम्हाला जगात टिकायचं असेल तर सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, मग ते काय मूर्ख होते का?. छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी, येसुबाई सगळ्यांनीच हिंदीसह अनेक भाषा शिकल्या, ते लोक काय मूर्ख होते का? भाषेवरुन असे वाद करणे, मतांचं राजकारण करणं चुकीचं आहे."
मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातून आणि विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, पहिल्यांदा बरळल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
संजय गायकवाडांनी माफी मागावी
आमदार संजय गायकवाड यांच्यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, "छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, जिजाऊंचा अवमान करणाऱ्या आमदाराने जाहीर माफी मागावी. दिल्लीची हुजरेगिरी करण्यात किती लाचारीं करायची? याची मर्यादा ओलांडण्याचं काम एसंशी गटाचे प्रमुख आणि त्यांचे आमदार करत आहेत. ज्यांची नकली शिवसेना, गळ्यात नकली वाघाचे दात घालून फिरणाऱ्या अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र आणि मराठी प्रेमाची अपेक्षाच करू शकत नाही. ज्याला उपकाराची जाणीव नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं."
बाळासाहेब ठाकरे असतानाही ठाकरे हा ब्रँड नव्हता असं संजय गायकवाड म्हणाले होते. त्यावरही जयश्री शेळकेंनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "ठाकरे ब्रँडबद्दल बोलताना हा आमदार स्वतःचा इतिहास विसरला. बुलढाण्यात विधानसभा निवडणुकीत हा तीन वेळा पराभूत झाला. चौथ्यादा ठाकरे ब्रँडमध्ये आला आणि निवडून आला. याला म्हणतात ठाकरे ब्रँड. ज्यांना वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरणे सोडून द्यावे."
ही बातमी वाचा:

























