(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झाडांवरील लाईटिंगवर बंदी आणा, पर्यावरणप्रेमींची हायकोर्टात जनहित याचिका; कोर्टाची राज्य सरकारला नोटीस जारी
Lighting On Trees : झाडांवर जगणाऱ्या पशूपक्षांसाठी लाईटिंग हानिकारक असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला. त्यानंतर मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर महापालिकेसह राज्य सरकारला कोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली.
मुंबई: सण-उत्सावादरम्यान रस्त्यांवरील झाडाला लाईटिंग करु देऊ नका, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली आहे. ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ही जनहित याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारसह मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकेला नोटीस जारी केली आहे.
यावर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या मुद्द्यावर हायकोर्टानं मुंबईसह तीन महापालिकांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र हा विषय केवळ महापालिकांपुरता मर्यादीत नसून राज्य सरकारनंदेखील याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देत हायकोर्टानं यावरील सुनावणी चार आठवड्यांकरता तहकूब केली आहे.
काय आहे याचिका?
रोहित जोशी हे येऊर पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी दिवाळीत मंबई, ठाणे व मिरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी झाडांना लाईटिंग करण्यात आली होती. यावेळी फाद्यांवर केवळ लाईटिंग केली जात नाही तर मोठे-मोठे प्रखर दिवेही लावले जातात. काही भागात सण-उत्सावाला लाईटिंग केली जाते.
मुंबई काही ठिकाणी तर झाडांवर कायमस्वरुपी लाईटिंग केलेली आहे. यात प्रामुख्यानं शिवाजी पार्क, मलाबार हिल, वाळकेश्वर, ब्रिच कँडी व अंधेरी येथे या भागांचा समावेश आहे. तसेच ठाणे, मिरा-भाईंदर मध्येही काही ठिकाणी अशाच प्रकारे कायमस्वरुपी झाडांवर लाईटिंग केलेली असते. मात्र याचा दुष्परिणाम झाडांवर होतो. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्यानुसार झाडांना कोणत्याही प्रकारची हानी करण्यास मनाई आहे. तरीही ही लाईटिंग करुन स्वत:च्या हौशीखातर झाडांची हानी केली जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
झाडांवर केलेली लाईटिंग पक्षांसाठीही हानिकारक असते. पक्षांच्या प्रजनन व अन्य क्रियेसाठी ही लाईटींग घातक असते. मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदरमध्ये झाडांवर करण्यात येणारी लाईटींग पक्षांसाठी धोकादायक असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या -
सध्या झाडांवर असलेल्या लाईटींग तत्काळ काढून टाकाण्याचे आदेश द्यावेत.
सण-उत्सवाला झाडांवर लाईटींग करु देऊ नका. त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करा.
या समितीमध्ये पर्यावरण अभ्यासक व अन्य सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असावा.
सण-उत्सावात झाडावर लाईटींग लागणार नाही यावर समिती देखरेख ठेवेल.
कोणीही झाडावर लाईटींग करु नये यासाठी पालिकेनं जनजागृती करावी.
झाडाला केबल वायर लपेटण्यासाठी प्रतिबंध करावं.
तसेच झाडांवर जाहिराती, साईन बोर्ड लावण्यासही मनाई करावी.
ही बातमी वाचा: