Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नववा स्मृतीदिन; शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी निर्बंध उठवण्यात आल्यानं शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर येऊ शकले नव्हते. परंतु, यावर्षी निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.
रिगल सिनेमाच्या चौकात बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
रिगल सिनेमाच्या चौकात उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे उपस्थित होते. यावेळी किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अग्निशमन दलाच्या हायड्रॉलिक शिडीच्या सहाय्यानं पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करण्यात आली.
...तर बाळासाहेबांनी त्यांना पाच फुट जमीनीत गाडले असते : सामनाचा अग्रलेख
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नववा स्मृतीदिन. यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा देणारा अग्रलेख शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून लिहिण्यात आला आहे. सामनामध्ये म्हटलंय की, "अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्य हे भीकेत मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर वाद उठलेला असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी त्याचं समर्थन केलं. अवधूत गुप्तेसारखे गायकही अप्रत्यक्षपणे गोखलेंच्या बाजूनं उभे राहिले. ह्या सर्वांचा समाचार घेताना अग्रलेख म्हणतो- स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते."