विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश
Mumbai High Court : नागपाडा पोलिसांना याप्रकरणी तातडीनं कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई: विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच, असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं बकरी ईदच्या पूर्वसंध्येला हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. राज्य सरकारसह पालिका प्रशासनला याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देत सदर प्रकरणी पालिकेला नागपाडा पोलीसांच्या मदतीनं तातडीनं कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे निर्देश जारी केले.
रहिवासी संकुलात खुल्या जागेत कुर्बानी देण्यास विरोध करत हायकोर्टात हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगाव परिसरातील दोन रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. वकील मिखाईल डे यांनी याप्रकरणी याचिकाकर्त्यांची बाजू हायकोर्टात मांडली. खुल्या जागेत जनावरांची कुर्बानी दिल्यानं अनेक प्रकारचं प्रदूषण तसेच आजार पसरण्याचा धोका असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. याची दखल घेत हायकोर्टानं पालिका प्रशासनाला विनापरवानगी कुर्बानी थांबवण्याचे निर्देश देत ती जनावरं ताब्यात घेण्याचे निर्देश दिलेत. तसेच या कामात नागपाडा पोलीस ठाण्याची मदत घेण्याचेही निर्देश जारी केले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी 3 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलीय.
काय आहे प्रकरण?
मुंबई सेंट्रल परिसरातील नाथानी हाईट्स टॉवरशी संबंधित एका प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीकरता न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांचं खंडपीठ रात्री 8 वाजेपर्यंत कार्यरत होतं. या इमारतीत मुस्लिम आणि जैन धर्मीय रहिवासी एकत्र राहतात. गुरूवारी होणा-या बकरी ईदच्या निमित्त सोसायटीती काही रहिवाश्यांनी संकुलातील मोकळ्या जागेत कुर्बानीची तयारी केली होती. याला काही रहिवाश्यांनी विरोध केला होता. मात्र त्याविरोधात न जुमानता काही रहिवासी कुर्बानी देण्यावर ठाम होते. याबाबत तक्रार देऊनही स्थानिक पोलीस दाद देत नसल्यानं अखेर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
मीरा रोडमधील सोसायटीत वाद
मीरा रोडमधील एक हायफाय सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना मुंबईतील एका सोसायटीत घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार समाजातील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच लोकांनी सोसायटीच्या आवारात हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला.
ही बातमी वाचा: