Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँगच्या तीन यूनिटचा सहभाग, पुणे, पंजाब अन् हरियाणतून सूत्रं फिरली?
Baba Siddique : मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे फेसबुक पोस्टची माहिती मागवली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग आणि प्रवीण लोणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, मोहम्मद झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे तिघे फरार आहेत, पोलिसांकडून या तिघांचा शोध घेतला जात आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं पुणे, हरियाणा आणि पंजाब यूनिट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, त्यामध्ये बिश्नोई गँगचं हरियाणा आणि पंजाब यूनिट सक्रीय असल्याची माहिती आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याची मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुभम लोणकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी केली होती.सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शुभम लोणकरची कोणती भूमिका समोर आली नव्हती त्यामुळं त्याला सोडून देण्यात आलं होतं.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे माहिती मागवली
बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणात शुभम लोणकर सध्या फरार आहे. शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर या दोघांचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी पोलिसांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून माहिती मागवली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनी पैसे आणि शस्त्र पुरवण्यामध्ये मदत करत होते. शुभम लोणकर एका महिन्यापासून फरार आहे. शुभम आणि प्रवीण लोणकर यांना कोण निर्देश देत होता याचा तपास करण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी केली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंग या दोघांना घटनास्थळावरुन अटक केली आहे. तर,प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या :