कोविड-19 कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत मिळणार
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि यासंदर्भातील इतर कामांमध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : कोविड 19 (कोरोना) विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विविध कार्यवाहीमध्ये झोकून दिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावताना कोरोना बाधा होऊन मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार आहे.
कोरोना साथ आजाराच्या प्रतिबंधाशी निगडित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी दिले होते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासकीय उपक्रम यांना दिनांक 29 मे 2020 रोजी दिले. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
पाहा व्हिडीओ : अडीच महिन्यानंतर पाहायला मिळाली धावती मुंबई! सरकारी, खासगी कार्यालयं, बाजार सुरू
या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
कोविड 19च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेच्या विविध प्रवर्गातील कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी, मानसेवी कर्मचारी यांचा कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड 19 मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असेल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड 19 शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी हे सानुग्रह सहाय्य योजना लागू असेल.
सानुग्रह सहाय्यासाठी निकष देखील निश्चित करण्यात आले आहेत. सदर कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी 14 दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक असेल.
ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय घेईल.
संबंधित कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागेल.
अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावा कर्त्याचा ओळख पुरावा, मृत व दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची प्रमाणित प्रत, कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत, चाचणी झाली नसल्यास किंवा चाचणी चुकीचा निगेटिव्ह असल्याची शक्यता असल्यास त्या प्रकरणणंमध्ये अधिष्ठाता समितीचा अहवाल, संबंधित रुग्णालयाचा मृत सारांश, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आदी सादर करावे लागतील.
कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी, कामगार यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित खाते प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. सामाजिक संस्था/ठेकेदार यांच्यामार्फत नियुक्ती झाली असल्यास त्या कामाच्या अनुषंगाने महापालिकेकडे जमा केलेली वर्कमॅन कॉम्पेनसेशन पॉलिसी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, ईएसआय योजना आदींची प्रमाणित प्रत द्यावी लागेल.
दावेदाराने अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रं संबंधित खात्याकडे सादर केल्यानंतर या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. संबंधित खात्याने दावा तयार करुन तो प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल. प्रमुख कर्मचारी अधिकारी खात्यामार्फत त्याची छाननी करुन ते प्रकरण प्रमुख लेखापाल (वित्त) खात्याकडे अधिदानासाठी देण्यात येईल.संबंधित बातम्या :
मजुरांना निरोप देण्यासाठी आलेल्या सोनू सूदला वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखलं
फरार नीरव मोदीला मोठा झटका, 1400 कोटींची मालमत्ता होणार जप्त
अंबरनाथ, उल्हासनगरात कोरोना संशयितांचे हाल, अहवालाच्या प्रतीक्षेत असताना त्रास झाल्यास उपचार नाही
कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई