Arun Gawli : डॅडी तुरुंगाबाहेर, आता दुसरी मुलगीही निवडणुकीच्या रिंगणात, कोण आहे योगिता गवळी-वाघमारे?
Yogita Gawli Waghmare : योगिता गवळीच्या रुपात अरुण गवळीच्या घरातील तिसरी व्यक्ती राजकारणात उतरणार आहे. लेकीच्या राजकीय करिअरसाठी अरुण गवळी आता काय पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळी राजकारणात सक्रिय होणार का असा प्रश्न सतत विचारला जातोय. त्याचं उत्तर आता अरुण गवळी आणि त्याची मुलगी माजी नगरसेविका गीता गवळी या दोघांनीही दिलं. अरूण गवळीची अखिल भारतीय सेना मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि गवळीची दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे.
नवरात्रीची पहिली माळ अन् दगडी चाळीत एकच लगबग होती. अठरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळीच्या हस्ते दगडी चाळीतील घटस्थापना पार पडली. डॅडीने स्वतःसाठी काय मागितलं असेल हे देवीलाच माहीत. मात्र लेक योगितासाठी नक्कीच मागितलं असेल. कारण आता अरूण गवळीची दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहे.
Who Is Yogita Gawli Waghmare : कोण आहे योगिता गवळी-वाघमारे?
कुख्यात डॉन, माजी आमदार अरूण गवळीची दुसरी कन्या म्हणजे योगिता गवळी. योगिता गवळी-वाघमारे या व्यवसायाने वकील आहेत. त्या 'करा' फाऊंडेशनच्या संचालिका आहेत. आठ वर्षापूर्वी योगिता गवळी- वाघमारे यांनी करा फाऊंडेशनची स्थापना केली होती. करा फाऊंडेशनच्या त्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, समाजसेवा करतात.
सिने अभिनेते अक्षय वाघमारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाचा श्रीगणेशा करणार आहेत. योगिताच्या रुपात गवळी घराण्यातली तिसरी व्यक्ती राजकारणात उतरणार आहे. तसेच अखिल भारतीय सेनेच्या तिकीटावर त्या पहिल्यादांच निवडणूक लढवणार आहेत.
अरूण गवळीची थोरल्या कन्या गीता गवळी या आधीपासूनच राजकारणात आहेत. त्या मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या नगरसेविका होत्या. मुंबई महानगर पालिकेत गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे दोन नगरसेवक होते. यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहेत. वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली.
कारागृहातून सुटलेला डॉन पुन्हा राजकारणात येण्यासाठी इच्छुक नाही. मी आधीच सांगितलं आहे की निवडणुकीबाबत इच्छुक नाही आणि निवडणुकीत उतरणारही नाही असं अरुण गवळीने म्हटलंय.
माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी जामिनावर सुटलेला अरूण गवळी, लेकीच्या पॉलिटिकल करिअरसाठी कोणती पावलं उचलणार? पॉलिटिकल ट्रॅकवर योगिता गवळी किती मोठा पल्ला गाठणार? या सगळ्या गोष्टी पाहणं औत्सुक्याचं असेल.
ही बातमी वाचा:





















