(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बसच्या सीटवर बसण्यावरून वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
बसच्या सीटवर बसायला जागा दिली नाही या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीला अटक केली आहे.
कल्याण : बसच्या सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर टोळीने जीवघेणा हल्ला केला आहे. उल्हासनगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्यात योगेश केहरी हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या राजू सय्यद आणि रोशन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी राजू सय्यद याला अटक केलीय. भररस्त्यात सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर येथे राहणारा योगेश हा भिवंडी येथील एक खाजगी ऑनलाईन शॉपिंग कंपनीमध्ये काम करतो. योगेश 14 तारखेला कामावरून घरी येण्यासाठी कंपनीच्या बसमध्ये बसला. याच वेळी राजू सय्यद याने मला सीटवर बसू दे उठ, असे योगेशला म्हटले. मात्र तब्येत बरी नसल्याने योगेश सीटवरून उठला नाही. मात्र सीटवर बसू दिले नाही म्हणून राजूला संताप अनावर झाला.
दरम्यान राजू सय्यदने 5 ते 6 जणांना शहाड ब्रिज जवळ बोलवून घेतले. काही वेळात उल्हासनगरच्या शहाड ब्रिज जवळ बस येताच राजू आणि त्याच्या साथीदारांनी बस थांबवली. बसमधून योगेशला खाली उतरवले आणि शिवीगाळ करत थेट लोखंडी रॉड, दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. एकप्रकारे त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
योगेशने त्यांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करत जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. मात्र यात योगेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. योगेशच्या तक्रारीवरून या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी राजू सय्यद आणि रोशन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी राजू सय्यद याला अटक केलीय तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.