Andheri East Bypoll: भाजपची माघार तरीही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होणारच; ऋतुजा लटकेंचा आता या सहाजणांशी सामना
Andheri Bypoll Election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारांच्या वैध नामनिर्देशनपत्रांपैकी 7 उमेदवारांची उमेदवारी मागे घेतली आहे. आता 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे.
Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली. भाजपनं माघार घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज होता मात्र तसं झालेलं नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदार पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती.
आज 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी 3 वाजेपर्यंत 14 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत 7 उमेदवारांपैकी एका उमेदवारास आपले मत देऊन नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता ऋतुजा लटके यांच्यासाठी हा सामना एकहाती असणार आहे. तरीही बिनविरोध होईल असं वाटणारी ही निवडणूक मात्र आता पार पडणार आहे. त्यामुळं आता 3 नोव्हेंबरच्या मतदानाची प्रतीक्षा आहे.
अर्ज मागे घेतलेले उमेदवार
१. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)
२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
३. श्री. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)
४. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
५. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
६. श्री. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
७. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
अंतिम यादीतील उमेदवार
१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)
याच अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाच्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदार संघातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.
ही बातमी देखील वाचा- Andheri East Bypoll Muraji Patel: मुरजी पटेलांच्या उमेदवारी माघारीची घोषणा अन् कार्यकर्ते संतापले; भाजपविरोधात केली घोषणाबाजी