Shiv Sena Clash : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी
Shiv Sena Clash : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला.
मुंबई: शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
ठाकरे गट आक्रमक...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
महिलांना धक्काबुक्की, शिंदे गटाचा आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.
ठाकरे गटाने काय म्हटले?
शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले.