(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम यांनी 2019 मधून मध्ये मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र गजानन किर्तीकर यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता. आता याच मतदारसंघातून अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.
Sanjay Nirupam : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मुंबईतील सहापैकी चार जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध करत थेट खिचडी चोर असे संबोधल्याने आणखी तणाव वाढला असतानाच संजय निरुपम काँग्रेस सोडणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
आज (29 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल दोन तास नॉट रिचेबल राहिल्याने नेमके ते गेले कुणीकडे? असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात होता. मात्र, या गायब झालेल्या दोन तासांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय निरुपम यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर आरोप करतानाच काँग्रेसच्या नेत्यांवरही टीकास्त्र डागले होते. त्यामुळे निरुपम हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती.
संजय निरुपम यांचा 2019 मध्ये पराभव
संजय निरुपम यांनी 2019 मधून मध्ये मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र गजानन किर्तीकर यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता. आता याच मतदारसंघातून अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसने ही जागा आपल्याला ठेवायला हवी होती असे संजय निरुपम यांचं म्हणणं आहे. मात्र, ठाकरे गटाकडून थेट उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून या ठिकाणी निवडणूक लढवणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. दरम्यान काल गोविंदा यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसतात का? याकडे सुद्धा आता लक्ष असेल.
महाराष्ट्रातील 17 जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीमधील धुसफूस समोर आली आहे. ठाकरे यांनी मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अमोल कीर्तीकर यांच्याशिवाय मुंबई ईशान्यमधून संजय पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांची नावे जाहीर करण्यात आली. अमोल कीर्तिकर हे मुंबई वायव्य मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अमोल कीर्तिकर यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोविड-19 कालावधीत स्थलांतरित कामगारांना 'खिचडी' वाटण्याचे कंत्राट देण्यात अनियमितता केल्याप्रकरणी समन्स बजावले होते.
'शिवसेनेने काँग्रेसला एक जागा दिली'
जागा वाटपावर संजय निरुपम म्हणाले होते की, 'आज शिवसेनेने (ठाकरे गट) मुंबईतील 4 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. त्यांनी काँग्रेससाठी एक जागा देणगी म्हणून सोडली आहे. या निर्णयाला माझा विरोध आहे. मी शिवसेनेला (ठाकरे गट) विरोध करतो आणि शिवसेनेशी वाटाघाटी करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचा निषेध करतो. वायव्य मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. मी अशा ‘खिचडी चोर’ उमेदवाराचा प्रचार करणार नाही. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी 'सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य जागांसाठी उमेदवार जाहीर करणे हे योग्य नसल्याचे म्हटले होते. त्यांनी ‘युती धर्म’ पाळत घोषणा टाळायला हव्या होत्या. आम्ही सांगलीची जागा अजूनही मागितली असून शिवसेनेने निर्णयाचा फेरविचार करावा. आम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल दिल्लीला माहिती दिली आहे.