Mumbai Train Accident Pushpak Express: सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Train Accident: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू. सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला.

Mumbai Pushpak Express Accident: मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस गाडीतून रेल्वे ट्रॅकवर पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 8.25 वाजता लखनऊला जाणारी पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) सीएसएमटी स्थानकावरुन सुटली होती. या एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशी दारात लटकत होते. ट्रेन मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान असताना दारावर लटकलेले काही प्रवासी खाली ट्रॅकवर पडले. हे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यापैकी बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Train Accident)
स्वप्नील निला यांच्या माहितीनुसार, सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. मात्र, दहा वाजल्यानंतरही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनाच हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती मिळाली नव्हती. केवळ कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवासी पडले, एवढीच माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे होती. हे प्रवासी पुष्पक एक्स्प्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून पडले, याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम होता. तसेच हा अपघात घडल्यानंतर या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून मुंब्रा स्थानकात आणण्यात आले. मात्र, त्याठिकाणी या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. अपघात होऊन जवळपास सव्वा तास उलटल्यानंतरही जखमी प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडून होते. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृ्त्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा आणि कळवा परिसरात हा अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या रेल्वे प्रशासनाच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. यावर आता रेल्वे प्रशासन आणि सरकारकडून काय उत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, या अपघातामुळे मुंबईतील रेल्वे अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जवळपास दररोज गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होता. प्रवाशांनी वारंवार संताप व्यक्त करुनही रेल्वेच्या कारभारात फरक पडलेला नाही.
आणखी वाचा























