Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं?
Akshay Shinde Encounter : अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबई: बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका सोशल मिडिया पोस्टने या प्रकरणाचा सस्पेन्स वाढवला आहे.
आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडियावरती एक्स (पुर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग आहे. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका... निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. असं लिहत ती कॉल रिकॉर्डिंग त्यांनी शेअर केली आहे. कथित क्लिपमध्ये संवादाची एबीपी माझा पुष्टी करत नाही.
काय आहे कॉल रिकॉर्डिंग मध्ये?
पहिला व्यक्ती - मी तुम्हाला एक व्हॉट्सअप केलं होतं. पण नंतर मी घाबरलो आणि ते मी डिलीट केलं.
दुसरा व्यक्ती - अच्छा, पण का?
पहिला व्यक्ती - त्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, त्याच्या मागे माझी गाडी होती.
दुसरा व्यक्ती - अच्छा.
पहिला व्यक्ती - मी घाबरलो होतो, त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही, मी तुम्हाला सांगितल्यावर वेगळा मेसेज गेला असता, त्यानंतर ते लोक माझ्या मागे लागले असते.
दुसरा व्यक्ती - व्हिडिओ होता का तुमच्याकडे त्या घटनेचा?
पहिला व्यक्ती - नाही. व्हिडिओ नव्हता, मी आणि माझा मेव्हणा एका रॅलीसाठी चाललो होतो, बायपास वरून तिकडून जात होतो. मुंब्राच्या आसपास त्यांची व्हॅन आम्हाला ओव्हरटेक करून गेली. त्यामध्ये पडदे लावण्यात आलेले होते. त्यानंतर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं गाडीचा काहीतरी आवाज झाला, मी थोडा घाबरलो, म्हटलं काहीतरी विषय झाला असावा. पोलिसांनी गाडी थांबवली, ते बाहेर आले. दोन पोलिसांनी त्याला बाहेर आणलं, त्याला नंतर बंद केलं, पुन्हा ते निघून गेले. पुन्हा एकदा आवाज आला. मग आम्ही घाबरलो. पुन्हा आम्ही गाडी ओव्हरटेक केली आणि पुढे निघून गेलो. आत्ता पण मला भीती वाटते आहे, तुमच्याशी बोलताना, पुढे काही होऊ नये यासाठी.
दुसरा व्यक्ती - काही होणार नाही
पहिला व्यक्ती - गाडी थोडी उचलल्यानंतर कसा मोठा ठक् असा आवाज येतो, तीन वेळा तसा ठक् ठक् आवाज आला. गाडीला पडदे लावलेले होते, माझा मेव्हणा पण घाबरला. तो पण म्हणाला इकडून लवकर जाऊयात. मोबाईल बंद होता आमचा, तो म्हणाला, रॅलीमध्ये चाललो आहे तर लवकर गुपचूप चला. त्यानंतर आम्ही आलो, नंतर आम्ही मोबाईल पाहिला, की अक्षय शिंदेची बातमी येत आहे. त्यानंतर आम्ही विचार केला की, हे कोणाला सांगावं, तुमच्यावर विश्वास होता. त्यामुळं तुम्हाला सांगायला आलो.
दुसरा व्यक्ती - तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज केले होते, काय होते ते?
पहिला व्यक्ती - मी व्हॉट्सअप मेसेज वरती पण हेच सांगितलं होतं. अक्षय शिंदेचा मर्डर मी पाहिला आहे. पण, मग मी नंतर डिलीट केलं.
दुसरा व्यक्ती - यामध्ये घाबरण्यासारखं काही कारण नाही.
पहिला व्यक्ती - पोलिसांनी जाणून बुजून रॅलीच्या वेळी मारलं आहे, त्याला. तिथे आसपास सीसीटीव्ही कॅमेरे असतील ना
दुसरा व्यक्ती - नाही, तिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. पोलिस घटास्थळ कोणतं सांगत आहेत माहिती आहे, का? भाई जंक्शनचा जो नवा ब्रीज सुरू होतो. तो ब्रीज सुरू झाल्यानंतर थोडं पुढे.
पहिला व्यक्ती - नाही. मी सांगतो ही घटना कुठे घडली आहे ती. दर्गा आहे ना. तिथे छोटा डॅम होता. फकीरशहा च्या इथून थोडं पुढे गेल्यानंतर ठक् असा आवाज आलाय.
दुसरा व्यक्ती - मुंब्रा कडून जातो तिकडून
पहिला व्यक्ती - आपण मुंब्राकडून येतो ना, कळावा कडे जाण्यासाठी
दुसरा व्यक्ती - मुंब्राकडून ठाण्याकडे जातो, त्या मार्गाकडे.
पहिला व्यक्ती - हा तिकडून जात होते, जवळपास दर्गा पार केली होती, तेव्हा आम्हाला ओव्हरटेक केलं होतं. त्यांचा थोडा स्पीड होता, आम्ही स्लो जात होतो. तेव्हा मला वाटलं, गाडीचा आवाज आला असावा. त्यानंतर दोन पोलिस उतरले. त्यांच्या अंगावर वर्दी नव्हती. नॉर्मल कपड्यांमध्ये होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा दरवाजा बंद केला. चावी लावली. पुन्हा गाडी पुढे नेली. पुन्हा तिसरा आवाज आला, जिथे पूल संपतो, तिथे ते थांबले काही वेळ आम्ही पाहत होतो, माझा मेव्हणा म्हणाला, चला आपण निघूया इकडून, त्यानंतर आम्ही गेलो. त्यानंतर ते कळव्याकडे गेले. त्या गाडीला पडदे वगैरे लावले होते.
दुसरा व्यक्ती - ठीके, मी पाहतो. तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, का ते चेक करतो.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU
नेमकं काय घडलं?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीररीत्या जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.