पूरग्रस्तांच्या मदतीला बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून मोठा चेक; शिक्षक 1 दिवसाचा पगार देणार, पारलिंगीही सरसावले
लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 50 लाख रुपये मदत करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) शेतकऱ्यांचं अनोतान नुकसान झालं आहे. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही वाहून गेली आहेत. त्यामुळे, बळीराजावरील या संकटात आता माणूसकीचा आधार देण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ 2215 कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली असून पुढील काही दिवसांत ही मदत शेतकऱ्यांपुढे पोहोचेल असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे आता मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही शेतकऱ्यांना (Farmers) मदत केली जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय विद्यमान आमदार, खासदार यांनी आपले 1 महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देऊ केले असून सरकारी कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत. आता, लालबागचा राजा (Lalbaugcha raje) सार्वजनिक गणेश मंडळानेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 50 लाख रुपये मदत करण्यात आली असून मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 लाखाचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द जाणार केला आहे. तर, राज्यातील सर्व शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. शेतातील पिकांचे नुकसान झालेला आहे, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षकांच्यावतीने एका दिवसाचे वेतन या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलं जाणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
पारलिंगी समुदायाकडूनही मदतीचा हात
सोलापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या तोंडावर मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातील पारलिंगी समुदायाने गुरुवारी जोगवा मागून जमा झालेली रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिली. तहसील कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यायत्ता निधीत चलन भरून रोख रक्कम सुपूर्द केली.
दरम्यान, कलाकार आणि खेळाडूही मदतीचे आवाहन करत आहेत. अभिनेता प्रवीण तरडेने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे. तर, टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही शेतकऱ्यासाठी सर्वांनीच मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केलं आहे.























