पंचनामे करणाऱ्यांच्या मदतीसाठी गेला, अतुल घरी परतलाच नाही; लेकरू वाहून गेलं, मृतदेह पाहून आईने फोडला हंबरडा
मागील चार ते पाच दिवस अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपले आणि अनेक ठिकाणी ओढे, नदी-नाले यांना पूर आल्याचं चित्र आहे.

अहिल्यानगर : राज्यातील मुसळधार पावस सुरू असतानाच, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यालाही 4 ते 5 दिवस जोरदार झोडपले. या पावसाने (Rain) बळीराजाचं कंबरडं मोडलं असून शेतीसह जनावरही वाहून गेल्याने मोठं दु:ख शेतकऱ्यावर कोसळलं आहे. तर, काही ठिकाणी मुनष्यहानीही झाली असून कुणाच्या घरातला कर्ता गेलाय, तर कुणाच्या घरातलं लेकरू पुराच्या पाण्यात वाहून गेलंय. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्याला सर्वाधिक फटका या पावसाचा बसला. दरम्यान, मुसळधार झालेल्या पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील 31 वर्षीय अतुल शेलार या युवकाचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नुकतंच भविष्याची स्वप्न पाहणारं लेकरू, हाताशी आलेला पोरगा गेल्याने आईने हंबरडा फोडला असून शेलार कुटुंबीयांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय.
मागील चार ते पाच दिवस अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपले आणि अनेक ठिकाणी ओढे, नदी-नाले यांना पूर आल्याचं चित्र आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील ग्रामपंचायतीत काम करणारे शिपाई रावसाहेब शेलार यांचा मुलगा अतुल शेलार हा गावात कामासाठी गेला. मात्र, तो घरी परतलाच नाही. रावसाहेब शेलार हे ग्रामपंचायत शिपाई आहेत आणि अतुल हा त्यांना त्यांच्या कामांमध्ये मदत करत होता. 20 सप्टेंबर रोजी अतुल नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी गावात गेला, दिवसभर त्याने काम केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना कावजवळच असलेल्या ओढ्यावरील पाण्यात तो वाहून गेला. तब्बल तीन दिवस अतुलचा शोध सुरू होता, अखेर 23 सप्टेंबरला प्रशासनाला त्याचा मृतदेह खडकेवाडी या परिसरात आढळून आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.
पुलाची उंची वाढवली पाहिजे
अतुल हा केवळ ग्रामपंचायतचेच काम करत नव्हता तर कुणी गावातील व्यक्तींनी कामे सांगितले, तरी तो ऐकायचा. तो अतिशय शांत स्वभावाचा असल्याचं ग्रामस्थ सांगतात, सोबतच गावातील प्रत्येकाचा तो लाडका होता. गावातील ओढ्यावरून जाणारा पूल हा कमी उंचीचा असल्याने पुराच्या वाहत्या पाण्यातून जाताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे, शासनाने अशा कमी उंचीच्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून त्याची उंची वाढवणे गरजेचे आहे. पुलाची उंची कमी असल्यानेच ही घटना घडल्याचे अतुलचे वडील रावसाहेब शेलार यांनी म्हटलं. अतुल हा ग्रामपंचायत शिपायाचा मुलगा असताना इतर विभागाचे कर्मचारी देखील त्याला कार्यालयीन कामासाठी घेऊन जायचे. त्यामुळे, सर्वच कामे ही ग्रामपंचायत शिपायावर कशी? असा सवालही अतुलच्या वडिलांनी विचारला. जर त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी अतुलला नेले नसते तर तो आज आपल्यात असता, अशी खंत पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली.
हेही वाचा
लालसिंह राजपुरोहितकडे शिवसेनेत पुन्हा जबाबदारी; मराठी माणसाचे दुकान हडपल्याने केली होती हकालपट्टी

























