(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नव्या सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रिपद? राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. मात्र हे वृत्त खोटं आहे. याबाबत खुद्द राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Amit Thackeray News : राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात 'ठाकरे' या नावाचं महत्व काय आहे हे सांगायची गरज नाही. अशात आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. मात्र हे वृत्त खोटं आहे. याबाबत खुद्द राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत आहेत अशा शब्दात त्यांनी वृत्ताचं खंडन केलं.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाबाबत चर्चा रंगल्या आहेत. या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
या मंत्रिमंडळात अमित ठाकरे यांना मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. यावर राज ठाकरे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं 20 मंत्रिपदांची मागणी केली आहे. पण त्यांना 15 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.