(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | नव्या वर्षासाठी मुंबईत गाईडलाइन्स नाहीत- पालकमंत्री
सेलिब्रेशनवर असणार यंत्रणांची करडी नजर. मुंबईकरांचा उत्साह आणि मायानगरीमध्ये येत्या दिवसांत होणारी गर्दी पाहता सर्वत्र कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या नियमांचं पालन मात्र अनिवार्य
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाताळसण आणि नववर्षाच्या दृष्टीनं नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली होती. पण, आता नववर्षासाठी मात्र कोणतीही नवी नियमावली आखण्यात येणार नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
शहरातील सेलिब्रेशनवर यंत्रणांची करडी नजर असणार आहे. मुंबईकरांचा उत्साह आणि मायानगरीमध्ये येत्या दिवसांत होणारी गर्दी पाहता सर्वत्र कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या नियमांचं पालन मात्र अनिवार्य असेल.
हॉटेल आणि इतर ठिकाणं सुरु करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यांच्या एसओपीमध्ये नव्यानं कोणतेही बदल करण्यात येण्याचा प्रश्नच नाही. कोरोनाव्हायरस पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. मुंबई आणि मराहाष्ट्रात याचं प्रमाण मात्र कमी झालेलं आहे. जुन्या नियमावलीचा कालावधी वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो, पण नव्या वर्षासाठी वेगळी अशी नियमावली नसल्याचं अस्लम शेख म्हणाले.
Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक
कोरोनाच्या या संकटकाळात आनंदाची उधळण होत व्यापाऱ्यांचं आणि कोणाचंही नुकसान होणार नाही यावर भर देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय नियमावली नसली तरीही गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यांसारख्या भागात गर्दी करण्यास मनाई असेल. शिवाय सेलिब्रेशन करतेवेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि मास्कचा वापर मात्र सक्तीचा असेल याकडे त्यांनी पुन्हा लक्ष वेधलं.
मुख्य म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही नवी नियमावली नसली तरीही पुढील सहा महिन्यांसाठी सर्वांसाठी मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे. त्यामुळं कोरोनावर मात करण्यासाठी आता प्रशासनाला अपेक्षा आहे ती म्हणजे नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाची.
ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोनाहृची दहशत
दरम्यान, ब्रिटनमध्ये निरीक्षणामध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम विमान प्रवासावर झाला असून, रविवारपासूनच येथे सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचं कळत आहे.
भारतही सतर्क
ब्रिटनमध्ये आलेलं नवं संकट पाहता आणि हे संकट नियंत्रणापलीकडे असल्याचे संकेत मिळत असल्याचा अंदाज घेता भारतात सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. ज्याअंतर्गत आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. तर, दुसरीकडे देशात कोरोना लसीकरणाच्या हालचालींनी कमालीचा वेग पकडल्याचंही पाहायला मिळत आहे.