...म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबाबतचं ट्वीट डिलीट केलं : अजित पवार
अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. ट्वीट डिलीट केल्याचं कारण आता अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र हे ट्वीट डिलीट का केलं याचं कारण अजित पवार यांनी सांगितलं आहे. "समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली.
अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशी चर्चा रंगली.
याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात."
खरंतर अजित पवारांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्वीट अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी केलं होतं.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलं नाही. परंतु अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अभिवादनाचं ट्वीट केल्याने, त्यांचं भाजपवरील प्रेम कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
या ट्वीटनंतर दादा रॉक्स, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. त्यानंतर तासाभरातच अजित पवारांच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.
तर याआधी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं ट्वीटही चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांनी 'जय श्रीराम' एवढंच ट्वीट त्यांनी केलं होतं.
मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करतानाचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/Yrax09pQgs
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 25, 2020