(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवा प्रदूषणास कारणीभूत; सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे BMC ने हटवले
Mumbai Air Pollution BMC : मुंबईतील हवा प्रदूषणात भर टाकण्यास कारणीभूत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांची भट्टी, धुराडे महापालिकेने हटवले आहेत.
मुंबई: मुंबईतील 'सी' विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवा प्रदूषणाचा (Mumbai Air Pollution) स्तर वाढला आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून विविध उपाययोजनांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासोबतच आता व्यापक आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशांना अनुसरुन, नागरी वस्तीत सोने चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्यवसाय) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवार (दिनांक 6 नोव्हेंबर 2023) सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या अर्थात गलाई व्यावसायिकांचे एकूण चार धुराडे (चिमणी) निष्कासित करण्यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे.
सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारा वायू चिमणी/ धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराडे यांचे निष्कासन करण्यात आले.
मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी घसरली
राज्यातील काही शहरांमधील हवा गुणवत्ता पातळी (Air Quality Level) मध्यम (Moderate) ते वाईट (Bad) श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे.