Maharashtra Governor : सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? राजभवनात उद्या शपथविधी
Maharashtra Governor : आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानं राज्याचं राज्यपालपद रिक्त होतं.

मुंबई : सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती झाल्यानं महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडलं. आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्याचा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला आहे. त्यामुळं आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आज सकाळी (दि. 14) अहमदाबाद येथून तेजस एक्सप्रेसने मुंबईत दाखल झाले.यावेळी आचार्य देवव्रत पत्नी दर्शना देवी यादेखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं स्वागत केलं आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्यावतीनं आचार्य देवव्रत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तर, राजभवनात मुंबई पोलिसांच्यावतीनं गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सोमवारी सकाळी 11 वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील.
कोण आहेत आचार्य देवव्रत? Who is Acharya Devvrat ?
आचार्य देवव्रत हे जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आचार्य देवव्रत हे हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्रमध्ये प्राचार्य होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं असून सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत होते.
सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानं पद रिक्त
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली होती. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली. तर, बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली होती. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला होता. 12 सप्टेंबरला सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पद स्वीकारलं.
























