मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर ठाण्यातील हॉटेल मालकांचा संप तूर्तास मागे
मुख्यमंत्री आणि ठाणे पलिकमंत्री यांच्या आश्वासनानंतर असोसिएशनने बेमुदत संप मागे घेतल्याचे हॉटेल्स असोशिएशनचे रत्नाकर शेट्टी आणि बार अँन्ड रेस्टोरंट असोसिएशन अध्यक्ष यु. डी. शेट्टी यांनी सांगितले.
ठाणे : ठाण्यातील दुकानदारांच्या वेळेत सवलत देऊन बार अँन्ड रेस्टॉरंटला मात्र वेळेची मुभा न दिल्याने नव्या नियमावलीत हॉटेल्सवर अन्याय केल्याचा आरोप ठाण्यातील बार अँन्ड रेस्टॉरंट असोशिएशनद्वारा करण्यात आला होता. याच्याच निषेधार्थ 9 ऑगस्टपासून सर्व बार अँन्ड रेस्टॉरंट असोशिएशनने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्री आणि ठाणे पलिकमंत्री यांच्या आश्वासनानंतर असोसिएशनने बेमुदत संप मागे घेतल्याचे हॉटेल्स असोशिएशनचे रत्नाकर शेट्टी आणि बार अँन्ड रेस्टोरंट असोसिएशन अध्यक्ष यु. डी. शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास बार अँन्ड रेस्टॉरंटचा बेमुदत संप टळला आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या काळातील नियमावलीत सुधारणा करून नवी नियमावली जाहीर केली. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिकेने संगनमताने नवी नियमावली जाहीर केली. यात अत्यावश्यक सेवा आणि इतर दुकान आस्थापना यांच्या वेळेत वाढ करीत रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याचे नियमावलीत नमूद केले. तर दुसरीकडे बार अँन्ड रेस्टॉरंट यांची 4 वाजेपर्यंतची वेळ ठेवली. तीच वेळ कायम ठेवल्याने बार अँन्ड रेस्टॉरंट असोशिएशनद्वारे नाराजी व्यक्त करत सोमवार 9 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर बेमुदत संप मागे घेण्यात आल्याचे रत्नाकर शेट्टी आणि यु. डी. शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत काल हॉटेल मालकांचा कोर कमिटीची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले आणि काही दिवसांची मुदत मागितली. तर ठाण्यातील हॉटेल मालकांशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणी करून संप मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे आज ठाण्यातील असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बैठक झाली आणि त्यात संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसियांकाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक काल पार पडली. कोरोनाची स्थिती अजूनही गंभीर असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं. आठवड्याभरात परिस्थिती पाहुन निर्णय घेईन असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी हॅाटेल मालकांना दिलं आहे. राज्यातल्या हॅाटेल्स रेस्टॉरन्ट मालकांची लॅाकडाऊनच्या निर्बंधावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याच्या निर्बंधावर ठाम आहेत.