(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दणका! नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना झटका. वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार, ठाण्याचे जिल्हाधिकारी आजच आदेश देण्याची शक्यता.
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना झटका बसला आहे. समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार आहे. या संदर्भात आजच आदेश येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं वानखेडे यांना कारणं दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता या बारचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आहे. समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच, वयामध्ये विसंगती असल्याचं कारण देण्यात आले आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता. त्यावेळी अवघ्या 17व्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना मिळाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ज्यावेळी परवाना मिळाला त्यावेळी वानखेडेंचं वय हे अवघं 17 वर्षांचं होतं. त्यामुळे 17व्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
समीर वानखेडेंच्या नावावर बार आणि रेस्टॉरंट
समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतील वाशी येथे बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असल्याचा दावा मलिकांनी केला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीनुसार, हॉटेल सदगुरुचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. ते 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी करण्यात आले आणि नियमानुसार त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे.
हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंट असल्याने, या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केल्याचं समीर वानखेडेंनी एका इंग्रजी वृत्त पत्राला माहिती देताना म्हटलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha