बिग बी आणि अक्षय कुमार यांना RPI कडून संरक्षण, रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना इशारा
Big B अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.यानंतर त्यांच्या वक्तव्या विरोधात भाजप मैदानात उतरला होता. आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी देखील नाना पटोलेंवर टीका केली आहे.
![बिग बी आणि अक्षय कुमार यांना RPI कडून संरक्षण, रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना इशारा After Nana Patole warnings ramdas Athavale said that RPI will protect amitabh bachchan and Akshay Kumar बिग बी आणि अक्षय कुमार यांना RPI कडून संरक्षण, रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/20173343/amitabh-bachchan_Ramdas-Athawale_akshay-kumar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या वादात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी गेली आहे. Big B अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करील तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करील. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
आठवले यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.
नाना पटोले बिग बींची भूमिका असलेल्या झुंडला विरोध करणार? नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड सिनेमा रिलिज होणार असल्याची घोषणा काल झाली आहे. त्यामुळं आता नागपूर म्हणजेच विदर्भातील कथानकावर आधारीत नागराज मंजुळेंच्या या सिनेमाला नाना पटोले विरोध करणार का? याकडे लक्ष लागून आहे.
'झुंड' 18 जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरनं चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे आणि बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘कोविडनं आपल्याला अनेक झटके देत मागे आणलं. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण अखेर त्या दिवसांमध्ये परतलो आहोत.....’.
लोकशाही पद्धतीने विरोध करणार- नाना पटोले झुंडच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. यांचे जिथे सिनेमे प्रदर्शित होतील तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून लोकशाही पध्दतीने विरोध करू. आमचे लोक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट पाहणार नाहीत. आम्ही यांना जिथे मिळेल तिथे काळे झेंडे दाखवून आणि लोकशाही पद्धतीने करू. आम्ही कुठल्याही सिनेमागृह बंद पडणार नाही आणि कुठे यांचं शूटिंग बंद पडणार नाही. पण त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचे भूमिका आमची राहणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.
आधी काय म्हणाले होते नाना पटोले नाना पटोले म्हणाले होते की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. केंद्रसरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. लोकशाहीच्या मार्गाने जसं आधी मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांनी भूमिका मांडली, तशीच आताही भूमिका मांडावी, जर त्यांनी भूमिका नाही मांडली तर त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोलेंनी दिला होता.
भाजपकडून नाना पटोलेंवर हल्लाबोल नाना पटोलेंच्या इशाऱ्यानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं की, हे हास्यास्पद आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर बसल्यानंतर नाना पटोलेंना विस्मरण झालं आहे. काँग्रेसचा आत्मा हुकुमशाहीचा आहे, चेहरा मात्र लोकशाहीचा आहे. जनहितासाठी आम्ही बोलतो असं सांगायचं आणि पूजीपतींना मोठं करण्याचं काम करायचं, असं त्यांचं काम आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. आधी नाना पटोले हे स्वता काँग्रेस शेतकरी विरोधी असल्याचं म्हणायचे. नाना पटोलेही आधी काँग्रेसच्या विरोधात टिवटिव करायचे. शेतकरी आंदोलनादरम्यान काही नेते ट्विट करुन मनात जागा करण्याचा प्रयत्न करतेय. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, असं ते म्हणाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेमकं काय झालंय, हे शोधावं लागेल. यांना शेतकऱ्यांबद्दल काही प्रेम नाही. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं योगदान या लोकांनी तपासावं. त्याचं सामाजिक योगदान असताना नवीन अध्यक्ष झाल्यावर सनसनाटी काही तरी यावं म्हणून प्रयत्न केला जात आहे, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं होतं.महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)