आदित्य शिरोडकर यांच्यानंतर अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेची जबाबदारी द्यावी; कार्यकर्त्यांची मागणी
आदित्य शिरोडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधले आहे. यानंतर आता अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी मनसे कार्यकर्ते करत आहेत.
मुंबई : आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनसेने नवीन मनविसे अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची होत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणी आहे की मनसे नेते अमित ठाकरे यांना मनविसे अध्यक्ष पद देण्यात यावं. मात्र, राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी राज ठाकरेंनी पक्ष श्रेष्ठींना पक्षातील युवक नेत्यांची यादीही मागवली आहे. ज्यांचा विचार मनविसे अध्यक्ष पदासाठी केली जाईल. मात्र, हा निर्णय लवकर होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
या विषयावर नाशिक इथं एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले ‘साहेब जी जबाबदारी मला देतील ती मी स्वीकार करुन काम करेन’
भविष्यात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मनसेत एक मात्र मोठा चेहरा अमित ठाकरे असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांची आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकी पाहता शिवसेना व मनसेमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खास तरुण पिढीला पक्षासोबत जोडण्यासाठी आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेनं आता पक्षाच्या विद्यार्थी शाखेची नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडं दिलं जाणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, राज ठाकरे यावर वेगळा विचारही करण्याची शक्यता आहे.
कारण नेतेपद दिल्यानंतर अमित ठाकरे यांना मनविसे अध्यक्ष पद दिलं जाईल, अस वाटत नाही. कारण राज ठाकरे आणि मनसे पक्षाचे अमित ठाकरेंसाठी जे प्लॅन आहेत ते फक्त एका यूनिटपर्यंत मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित आहे. भविष्यात अमित ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांना पक्षाची दुसरी फळी ही तयार करायची आहे, ते पाहता राज ठाकरे त्यांना फक्त मनविसेची जबाबदारी देऊन त्यांचा कार्यक्षेत्र मर्यादित करणार नाहीत, अस म्हटले जातयं.
माझ्या अमित ठाकरेंना शुभेच्छा : आदित्य शिरोडकर
मनसे सोडून शिवबंधन हाती बांधणारे आदित्य शिरोडकर यांनी पक्षाकडून वारंवार डावललं जात असल्याने अपण पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकार करत असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पक्षा अंतर्गत त्यांच्या विरुद्ध 2009 पासून राजकारण सुरु असल्याचेही आदित्य शिरोडकर म्हणाले. ‘माझं पक्ष सोडण्याचं कारण मी उघड पणे चॅनेलवर सांगू शकत नाही. काही गोष्टी या सांगण्यापलिकडच्या असतात. मी पक्ष सोडताना राजसाहेबांना भेटलो नाही. अमित ठाकरे यांना जर मनविसेचं अध्यक्ष पद दिलं गेलं तर त्यांना माझ्या शुभेच्छा’
शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा भरणा मोठा आहे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांचं वत्कृत्व व आक्रमक बाण्याकडं आकर्षित होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील तरुण कार्यकर्त्यांनीही मनसेची वाट धरली होती. या कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केली होती. त्याचं अध्यक्षपद सुरुवातीपासूनच आदित्य शिरोडकर यांच्याकडं होतं. आता त्यांनी शिवबंधन हाती बांधल्यानं मनसेची विद्यार्थी सेना नेतृत्वहीन झाली आहे. विद्यार्थी सेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी व तरुणांना आकर्षित करण्यासाठी आता या विभागाचं नेतृत्व खुद्द कोणाला मिळत हे पाहण औचित्यचे ठरणार आहे.