एक्स्प्लोर
हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; मुंबईतल्या वकिलाची मागणी
हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच या प्रकरणाची सीबीआय अथवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे केली आहे.
मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच या प्रकरणाची सीबीआय अथवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मनवाधिकार आयोग, तेलंगणा उच्च न्यायालय आणि तेलंगणा पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा खटला निष्पक्ष चालावा यासाठी तो तेलंगणात न चालवता शेजारील राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात वर्ग करावा, अशीही मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
आज पहाटे हैदराबाद पोलिसांकडून घडलेलं हे कृत्य संशयास्पद असून पोलीस हे एखाद्या गँगस्टरप्रमाणे वागल्याचा सदावर्ते यांचा आरोप आहे. ते चौघेच्या चौघे आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, हा दावा पटण्यासारखा नाही असा डॉ. सदावर्ते यांचा दावा आहे. अश्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर देशातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात एक चुकीचा पायंडा पडू शकतो, अशी भावना सदावर्ते यांनी एबीपी माझाकडे बोलताना व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी हैदराबादजवळ एका पशुवैद्यक डॉक्टरची काही नराधमांनी निर्घृण हत्या केली होती. हत्येपूर्वी त्या पीडित महिलेचा त्यांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची माहिती समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र गुरूवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर देशभरातून हैदराबाद पोलिसांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे कायदेतज्ज्ञांकडून काहीशी नाराजीही व्यक्त होत आहे.
हैदराबाद हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं त्याठिकाणी नेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत.
27 नोव्हेंबरला देश हादरला
हैदराबाद शहराबाहेर असलेल्या शमशाबादमध्ये 27 नोव्हेंबरच्या चार ट्रक चालक आणि क्लीनरने महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारलं होत. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती.
घटनेचं रिकंस्ट्रक्शन म्हणजे काय?
प्रकरणाचा तपास आणि पुरावे मिळवण्यासाठी पोलिस घटनास्थळी जाऊन 'ती घटना कशी घडली' यासाठी घटनेचं रिकंस्ट्रक्शन करतात. घटनास्थळी आरोपींनाही नेलं जातं, जेणेकरुन ते आपल्या कृत्याच्या पाढा वाचतील. पोलिस हे यासाठी करतात जेणेकरुन त्यांच्याकडून खटला आणखी मजबूत होईल आणि कोर्टात प्रकरणाशी संबंधित सर्व पैलू मांडू शकतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement