ABP Majha Impact : मराठी शाळा वाचवा मोहीम! राज्यात जिल्हावार बैठका सुरु
एबीपी माझाच्या मोहिमेनंतर मुंबईत आणि राज्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एबीपी माझानं 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम लावून धरली आहे. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून आता मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मराठी शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, सोबतच त्यांचे वर्षानुवर्षे न सुटणारे प्रश्न सुटावेत, त्या टिकाव्यात व वाढाव्यात या हेतूने मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मराठी शाळांची चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर जिल्हावार बैठकींचे आयोजन केले जात आहे. या संदर्भातील चौथी बैठक रविवारी, 12 डिसेंबर रोजी, सोशल सर्व्हिस लीग शाळा, परळ (पूर्व) येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी पालक, शिक्षक, संस्थाचालक व मराठीप्रेमी यांना आवाहन करण्यात येत आहे.
या बैठकीला मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नोकरी नाकारलेले उमेदवार उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक खाजगी अनुदानित शाळेत पंचवीस-तीस वर्षे नोकरी करूनही निवृत्त झालेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना निवृत्त होऊन आठ-दहा वर्षे होऊन आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊनही पेन्शन मिळत नसलेले कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सोबतच 18 ते 20 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठी शाळांना अनुदान मिळत नसल्याने त्यांचे संस्थाचालकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त मराठी शाळांशी संबंधित अडचणी असलेल्या लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
मुंबईत मागील दहा वर्षांत मराठी शाळांची संख्या व विद्यार्थी संख्या निम्मी झाल्याची आकडेवारी पुढे येत आहे व महानगरपालिका यावर मंथन न करता इतर मंडळांच्या शाळा काढण्यात धन्यता मानत असेल, तर अशा मुद्द्यावर चर्चा व्हायलाच हवी, जाब विचारायला हवा. मराठी शाळा बंद करण्याचा हा डाव असल्याने व एकही राजकीय पक्ष यावर बोलत नसल्याने मुंबई व महाराष्ट्रातील मराठी शाळांसाठी दबावगट, संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होण्यामागचे कारण नेमकं काय?
- पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा
- इतर शाळांच्या तुलनेत बीएमसी मराठी शाळांचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
- अनेक मराठी बीएमसी शाळांमधील कमी असलेली
- शिक्षक संख्या आणि त्याचा गुणवत्तेवर होणारा परिणाम
- शिक्षकांना दिलेले जाणारे इतर कामे व त्यामुळे वर्गात शिकवायला मिळणारा कमी वेळ
- मराठी शाळांसाठी येणारे प्रकल्प आणि त्याची होणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अडचणी
संबंधित बातम्या :