कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला तब्बल 50-60 हजार नागरिक फिरकलेच नाहीत, मुंबई महापालिकेची माहिती
मुंबईतील मुदत उलटल्यानंतरही लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या 50 ते 60 हजार नागरिकांना शोधणं मुंबई महापालिकेला अशक्य आहे. याचं कारण म्हणजे या प्रलंबित 50 ते 60 हजार लाभार्थ्यांची कोणतीही माहिती मुंबई महापालिकेकडे उपलल्ब्ध नाही.
मुंबई : मुंबईत जलदगतीने कोरोना लसीकरण व्हावं यासाठी अनेक उपाय आजमवले जातायेत. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा नसल्यानं आधीच लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यात आता मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. मुंबईत 50 ते 60 हजार लोक असे आहेत, ज्यांनी लसीचा पहिला डोस तर घेतला मात्र मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस घेण्यासाठी ते केंद्रांवर पोहोचलेच नाहीत.
सध्या सराकारी लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण ठप्प आहे. सरकारी केंद्रांवर आम्हाला मोफत लस कधी मिळेल याची वाट तरुणवर्ग पाहतोय. मात्र दुसरीकडे मुदत संपल्यानंतरही अनेकजण लसीचा दुसरा डोस घेत नसल्याचं चित्र समोर येतंय. मुंबईत 50 ते 60 हजार नागरिकांनी मुदत उलटल्यानंतरही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या सूचनांनुसार लसीच्या दुसऱ्या डोससाठी वॉक-इन सुविधा उपलब्ध आहे. लसीचा दुसरा डोस घ्यायला येताना केवळ पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि लाभार्थी म्हणून असलेली नोंदणी तपासली जातेय.
मुंबईतील मुदत उलटल्यानंतरही लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या 50 ते 60 हजार नागरिकांना शोधणं मुंबई महापालिकेला अशक्य आहे. याचं कारण म्हणजे या प्रलंबित 50 ते 60 हजार लाभार्थ्यांची कोणतीही माहिती मुंबई महापालिकेकडे उपलल्ब्ध नाही. कोविन पोर्टलवरच लाभार्थ्यांची नोंदणी होत असल्याने आणि या पोर्टलचा कोणताही अॅक्सेस महापालिकेला नसल्य़ाने लाभार्थ्यांना शोधणं मुश्कील होऊन बसलंय. इतक्या संख्येनं जर दुसऱ्या डोसचे लाभार्थी प्रलंबित राहत असतील तर भविष्यकाळात लसीचे डोस वाया जाण्याचाही धोका आहे.
- मुंबईत पहिला डोस घेतलेले एकूण लाभार्थी - 30,29,825
- मुंबईत दुसरा डोस घेतलेले एकूण लाभार्थी - 7,94,457
मुंबईत कोविशिल्डची लस पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही डोससाठी उपलब्ध आहे. मात्र, कोवॅक्सिन लसीचा साठा कमी असल्याने ती केवळ दुसऱ्या डोससाठीच दिली जातेय. सध्यातरी मुंबईत लस वाया जाण्याचं प्रमाण हे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांनी लवकरात लवकर केंद्रांवर जाऊन लस घ्यावी, असं आवाहन केलं जातंय.