(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे मतदारसंघावर भाजपचा डोळा; नवरात्रोत्सवापाठोपाठ आता दिवाळीनिमित्त जांबोरी मैदानात कार्यक्रम
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी (Worli) या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दीपोत्सवाचं आयोजन करुन भाजपने बाजी मारली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर (BMC Elections 2022) झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने भाजपने (BJP) गेल्या काही वर्षांपासून कंबर कसली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत दहीहंडी, नवरात्री उत्सवाचे आयोजन करून भाजपाने एकप्रकारे शिवसेनेवर कुरघोडी केली होती. त्याचाच पुढचा अंक दिवाळीत बघायला मिळणार आहे. यावेळी तर भाजपने आपला मराठमोळा दिपोत्सवाचे आयोजन केले आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. वरळीतल्या जांबोरी मैदानवर (Jambori Maidan) भाजपने दीपोत्सवाचं आयोजन (Diwali 2022) करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी (Worli) या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दीपोत्सवाचं आयोजन करुन भाजपने बाजी मारली आहे.
भाजपने या संदर्भात ट्विट केले आहे. यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात, ढंगात साजरी करायची आहे. आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे.
यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात,ढंगात साजरी करायची आहे.
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) October 14, 2022
आपली खाद्य संस्कृती,आपली वेशभूषा, आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद लुटायचा आहे, आपण सर्व मुंबईकर आमंत्रित आहात दि. १९ ॲाक्टोबर ते २३ ॲाक्टोबर स्थळ- जांबोरी मैदान,वरळी. #आपला_मराठमोळा_दिपोत्सव. pic.twitter.com/3NXH9BxtAS
वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. काही महिन्यांपासून तर भाजप शिवसेनेला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सण उत्सव साजरा करण्यावर पुन्हा एकदा भर दिला आहे. 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने सेलिब्रेशन केले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आता मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू करत राजकीय पटलावर असणारं वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. जवळपास मागील कित्येक वर्षांपासून मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणं मुंबईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणं राजकीय वर्तुळात अमुक एका पक्षासाठी या मायानगरीतील प्रशासनावर असणारं वर्चस्व अतिशय मोलाचं. त्यामुळं येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं आतापासूनच भाजपनं तयारी सुरु केली आहे.