26/11 Terror Attacks : विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला?
26/11 Terror Attacks : मुंबई हल्लामुळे नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा आणि आरआर पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
26/11 Terror Attacks : राजकारणात सर्वात मोठा शब्द म्हणजे राजीनामा...काहीही झालं तरी राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो हे फार नॉर्मल आहे. 2014 ते 2019 या काळात सत्तेत असलेले शिवसेनेचे सगळेच मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. पण असाच एक राजीनामा 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी दिला होता.
मुंबईतील सामान्य माणसं रात्रीचं जेवण करून निवांत झोपायच्या तयारीत होती. सर्व काही नॉर्मल होतं. पण हॉल मधला टेलिव्हिजन सुरू झाला आणि सगळ्यांना धक्काच बसला. ती बातमी होती ताज हॉटेलमध्ये आणि CST रेल्वे स्टेशनवर झालेल्या गोळीबाराची. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तो दिवस होता 26 नोव्हेंबर 2008. आज त्या घटनेला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्या आठवणी मात्र आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यानंतर राज्यातील दोन बड्या नेत्यांना राजीनामे द्यावे लागले होते.
CST आणि ताज नंतर नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटलला पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांकडून टार्गेट करण्यात आलं होतं. हे संपूर्ण नाट्य तीन दिवस सुरू राहिलं आणि अखेर मुंबई पोलीस, NSG आणि MARCOS ने मिळून दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनेक लोक यात मरण पावले, अनेक पोलीस अधिकारी आणि देशाचे जवान या चकमकीत शहीद सुद्धा झाले.
परंतु हे नाट्य संपलं आणि झाला एक मोठा राजकीय वाद. ज्या मुळे विलासराव देशमुख आणि आर आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला. एखादी मोठी घडामोड झाली की त्यावर फिल्म बनवण्याचा मोह सर्वच फिल्ममकेर्सना असतो. असाच मोह कदाचित त्या वेळेस दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना सुद्धा झाला आणि ते थेट पोहोचले ताज हॉटेलमध्ये. त्यांच्या सोबत होते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे सुपुत्र रितेश देशमुख.
राम गोपाल वर्मा यांचा ताज हॉटेलमध्ये 26/11 च्या हल्ल्यावर फिल्म बनवण्याचा विचार असल्यानं रेकी करायला गेल्याचा आरोप झाला. तर रितेशला फिल्ममध्ये कास्ट करणार असल्याच वृत्त आलं आणि राजकीय वणव्याने पेट घेतला. या नंतर ती भेट सहज होती असा देखील सूर राम गोपाल वर्मा यांनी दिला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
सर्वच स्तरांवरून विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली. फिल्म इंडस्ट्रिनेसुद्धा राम गोपाल वर्मा यांच्यावर हल्लाबोल केला. एकीकडे निष्पाप लोकांचे गेलेले प्राण आणि दुसरीकडे फिल्मचा घाट, यामुळे सामान्य जनतेचा हा आर्क्रोश सहज दिसून आला. यानंतर काहीच दिवसांनी सलग चार वर्ष मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा थेट राजीनामा द्यावा लागला.
दुसरा राजीनामा...
या दरम्यान आर आर पाटलांनी पत्रकारांशी बोलताना शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातला एक डायलॉग मारला आणि राजीनाम्याला आमंत्रण दिले. तो डायलॉग होता 'बडे बडे शहरो में, एसी छोटी छोटी बाते होती रहती है'. यावरुन गोंधळ सुरु झाला आणि अखेर आर आर पाटलांनासुद्धा गृहमंत्री पदाची खुर्ची रिकामी करावी लागली होती.
पण एकंदरीत या दोन्ही नेत्यांची कारकीर्द फार मोठी आहेत आणि महाराष्ट्र राज्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.आज हे दोन्ही नेते आपल्यात नाहीत. परंतु महाराष्ट्र या लोक नेत्यांना कधीच विसरणार नाही.