आनंदाची बातमी! जे. जे. पोलीस ठाण्यातील 45 पैकी 18 कर्मचारी कोरोनावर मात करुन कर्तव्यावर हजर
कोरोना संसर्गामुळे सर्वात प्रभावित झालेले जे. जे. पोलीस ठाण्यातील 45 पैकी 18 जण कोरोना वर मात करुन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहे. या पोलीस ठाण्यात सर्वाधिक 45 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात सर्वाधिक प्रभावित झालेले जे. जे. मार्ग पोलीस ठाणे संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे. या एकाच पोलीस ठाण्यात तब्बल 45 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. यापैकी 18 कर्मचारी यशस्वी उपचारानंतर कर्तव्यावर परतले आहेत. तर, आणखी चार जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. लवकरचं ते देखील कामावर रुजू होणार आहे. आता उरलेल्या 23 कर्मचाऱ्यांचीही प्रकृती उत्तम असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच जवळपास सर्वचजण यातून सुखरुप बाहेर पडतील.
राज्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्गात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील जेजे पोलीस स्टेशन महाराष्ट्रमधील सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी असलेलं पोलीस स्टेशन झालं आहे. जे. जे. पोलीस स्टेशनच्या तब्बल 45 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. यामुळे सर्व पोलीस ठाणेचं क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, आनंदाची बाब अशी की यातील निम्मे कर्मचारी यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, काही पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. सध्या 23 कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्णालयात उपचार घेत असून या सर्वांची प्रकृत्ती उत्तम आहे.
पोलिसांना 50 लाखांचं कवच कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पोलिसांसाठी विशेष योजना कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते.
Ashok, Nivedita Saraf | अशोक सराफ अन् निवेदिता सराफ यांच्याकडून पोलिसांसाठी आमरस पुरीचा बेत