11वी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण; मुंबई विभागातून यावर्षी 2 लाख 23 हजार विद्यार्थ्यांकडून प्रवेश निश्चित, तर 97 हजार जागा रिक्त
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर लांबणीवर गेली होती. त्यामुळे खोळंबलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत होते. अखेर, डिसेंबरपासून दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्यासुद्धा ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई : मागील 3 महिन्यापासून सुरु असलेली अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया अखेर आज पूर्ण झाली आहे. यामध्ये यावर्षी 2 लाख 23 हजार 651 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही 36, हजार 358 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून देखील प्रवेश निश्चित केले नाहीत. मात्र, आता या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी नसणार आहे. कारण यापूर्वीच 16 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणारी विशेष फेरी ही अंतिम फेरी असल्याची सूचना उपसंचालक कार्यालयकडून देण्यात आली होती. मुंबई विभागातील एकूण 3 लाख 20 हजार 750 जागांपैकी शेवटच्या फेरीनंतर 97 हजार 99 जागा या रिक्त राहिल्या आहेत.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर लांबणीवर गेली होती. त्यामुळे खोळंबलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत होते. अखेर, डिसेंबरपासून दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्यासुद्धा ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यावर्षी अकरावी प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांचा कल सर्वधिक हा वाणिज्य शाखेकडे पाहायला मिळाला. 1 लाख 23 हजार 298 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश निश्चित केला. तर त्या खालोखाल 68 हजार 167 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे. तर 22 हजार 124 विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश निश्चित केला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया जरी लांबणीवर गेली असली तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग हे जानेवारी महिन्यापासूनच महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आले आहेत. तर राज्यभरात मुंबई वगळता इतर ठिकाणी प्रत्यक्ष वर्ग सुद्धा सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :