Mumbai Maratha Morcha : मराठा आंदोलकांचे तिसऱ्या दिवशीही हाल, सीएसएमटी स्थानकावर रात्र काढण्याची वेळ; मुंबईत येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांचीही अडवणूक
Mumbai Maratha Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.

Mumbai Maratha Morcha मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. अनेकांना रस्तावर तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्सवर रात्र काढावी लागली आहे. दुसरीकडे पालिकेच्यावतीने अंघोळ करण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवण्यात आला आहे. परंतु केवळ एक टँकर आल्याने अनेकांना गैरसोय होते असल्याचे मराठा आंदोलकच म्हणणं आहे. तसेच नैसर्गिक विधीसाठी पाणी नाही, अशी देखील आंदोलकांची तक्रार आहे.
सगळ्या प्रकारची तयारी आणि सोयी पुरवल्यात, मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मराठा आंदोलक राजधानी मुंबईत दाखल झाले आहे. असे असतांना प्रशासनाकडून मात्र कुठल्याही प्रकारे सोई सुविधा पुरविल्या जात नसल्याचं आझाद मैदानावरील मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांनी सांगितलंय. आंघोळीसाठी पाणी नाही, शौचालय नाही, जेवणासाठी फूड स्टॉल्स नाहीत. अशी तक्रार सुद्धा त्यांनी केलीय.
त्यानंतर मुंबई महापालिकेने आपण सगळ्या प्रकारची तयारी आणि सोयी पुरवल्या असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई महापालिकेने फॅशन स्ट्रीट रोडवर अडीशेच्या जवळपास पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था या आंदोलकांसाठी केली आहे. शिवाय आंघोळीसाठी टँकर सुद्धा मागवले असल्याचे सांगितलंय.
दुसरीकडे, आझाद मैदान आणि आसपास परिसरात राहणाऱ्या आंदोलकांना खाण्याची व्यवस्था राज्यभरातील मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. सकाळचा नाश्ता वाटप सध्या महानगरपालिके समोर सुरू आहे. केळी, सफरचंदे वाटप होत आहे. अनेक टेंपो सध्या नाश्ता वाटप करताना दिसत आहेत. तर मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून नाका बंदी करण्यात आली आहे. मुंबईत येणारी मराठा आंदोलकांची गाडी इथे थांबवण्यात येत आहे. त्या गाडीत असलेल्या आंदोलकांची चौकशी करून मुंबईत प्रवेश दिला जातोय. ज्या गाड्यांमध्ये खाण्याचे साहित्य आहे त्यांची नोंद केली जात आहे. तर या गाड्या कुठे पार्क करायच्या, याची माहिती मुंबई पोलीसंकडून आंदोलकांना दिली जात आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी
मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या टॅंकर, कंटेनर सारख्या गाड्या मुंबईच्या बाहेर थांबवल्या जात आहेत. यात थ्री एक्सेल, फोर एक्सेल, फाइव एक्सेल गाड्यांचा समावेश आहे. मात्र यामुळे काही माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या, भारताबाहेर एक्सपोर्ट करणाऱ्या गाड्या देखील थांबवल्या गेल्याने याचा फटका त्या वाहनचालकांना बसतोय.
आणखी वाचा

























